अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाचा वाढत कहर पाहून भाळवणी इथे तब्बल 1100 बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. शरद पवार साहेब आरोग्य मंदिर नावाने हे कोविड सेंटर सुरु केले असून या कोविड सेंटरला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत आहे. विशेष म्हणजे या कोविड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत मिळत आहे. आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे. इतकेच नाही तर काही परदेशी नागरिकांनी देखील निलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. केवळ परदेशातून 1 कोटी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत निलेश लंके यांना मिळाली आहे. कोरोनाच्या काळात आपण लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांची सेवा करत असून केवळ रुग्ण बरे व्हावे हा एकमेव उद्देश असल्याची प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत पाच हजाराहून अधिक लोकांनी मोफत उपचार घेऊन सुखरुप घरी परतले तर आता दुसर्या लाटेत 14 एप्रिलपासून सुरु केलेल्या या कोविड सेंटरमध्ये 2,500 लोक उपचार घेऊन घरी परतले आहेत. सध्या एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. निस्वार्थी भावनेने काम केलं तर हजारो हात देणारी असतात, असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं.
लोकप्रतिनिधींचं खरं काम काय असते हे आमदार निलेश लंके यांनी दाखवून दिलं आहे. निलेश लंके यांनी उभारलेल्या 1 हजार 100 बेडच्या भव्य कोविड सेंटरमधील 100 बेडला ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हे पाहिलं भव्य कोविड सेंटर आहे. आमदार निलेश लंके हे स्वतः या कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस करतात.
या कोविड सेंटरमध्ये रुग दाखल होण्यापासून तर डिस्चार्ज होईपर्यंत सर्व देखभाल करण्यात येते. रुग्णांसाठी औषधांसोबत पौष्टिक आहार देखील दिला जातो. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी वेगवेळी फळे दिली जातात. सकाळी अंडी आणि दूध, नाष्टा, दुपारी आणि रात्री जेवण दिलं जातं. दिवसातून दोन वेळा रुग्णांची तपासणी करण्यात येते. सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, मात्र निलेश लंके यांच्यासारखी प्रत्येकाने जर जबाबदारी घेतली तर या संकटातून बाहेर पडण्यास फार वेळ लागणार नाही.