Maoist love Story: आजवर तुम्ही माओवाद्यांच्या चकमकीच्या किंवा हल्ल्याच्या बातम्या अनेक वाचल्या असतील. मात्र तुम्ही कधी कोणत्या खऱ्याखुऱ्या माओवाद्याची प्रेम कहाणी वाचली आहेत का? इतरांना दगडासारखे मन करून कंठस्नान घालणारे जेव्हा स्वतः प्रेमात पडतात, तेव्हा काय होतं? तर तेव्हा ते हळवे होतात. अन् प्रेमासाठी कायपण म्हणत ते काही करायला तयार होतात. अशीच ही गोष्ट आहे गुरुवारी आत्मसमर्पण केलेल्या दोन जहाल माओवाद्यांची.


एकत्र कारवाया करत एक होण्याचा निर्णय घेतला 


आत्मसमर्पण केलेल्या या दोन जहाल माओवाद्यांची नावे आहेत कोलु ऊर्फ विकास ऊर्फ सुकांत विनोद (वय 27) आणि राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी (वय 30). यातील सुकांत याची माहिती देणाऱ्याला सरकारने एक ते आठ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर डेबो हिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. हे दोघेही अगदी लहान वयात नक्षल चळवळीत सामील झाले होते. तो छत्तीसगढमध्ये, तर ती गडचिरोलीत. पण साल 2011 मध्ये दोघांना एकाच ठिकाणी माओवाद्यांची कंपनी 10 मध्ये पाठवण्यात आले. मग काय एकत्र कारवाया सुरू झाल्या. कधी अंबुश लावणे, तर कधी गावात घुसून विरोधकांना मारणे, तर कधी थेट पोलिसांचाच जीव घेणे. प्रेमाचा ही रंग लाल असतो. अशातच एकत्र कारवाया करता करता हे दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि गोष्ट लग्नाच्या इच्छेपर्यंत पोहचली!     


लग्न करण्यासाठी करावी लागली नसबंदी 
  
इथूनच सुरू झाली ती प्रेमाची परीक्षा. लग्न करायची इच्छा चळवळीच्या नेतृत्वाला बोलून तर दाखवली, पण त्याला विरोध होता. शेवटी 2018 मध्ये ही अट घातली की नसबंदी केली तरच लग्नाची परवानगी मिळेल. यावेळी खरं तर दोघांच्या मनात माओवादी चळवळ सोडून संसार थाटायची इच्छा होती. पण चळवळीत घाबरवले जाते की, तुम्ही पोलिसांच्या हाती लागलात तर मारले जाल. म्हणूनच मन मारून का होईना विकासने नसबंदीची अट मान्य केली आणि हे लग्न पार पडले. एकदा घर सोडून जंगलात आले की चळवळ हीच प्राथमिकता आणि चळवळ हेच प्रेम अशा पद्धतीने सर्व अंतिम असते. त्यात कोणी जर एकमेकांच्या प्रेमात पडले, तर पचळवळीची प्राथमिकता संपते. त्यात मुले होऊ दिली, तर मग वेगळेच पाश. त्यामुळे एक वेळ लग्न करू दिले, तरी मुले होऊ नये म्हणून नसबंदी ही कंपल्सरी असते. यातच लग्न ही तसे वेगळेच असते. मंत्रोच्चार नसतात इथे. आता एकाचे दोन होऊन, जास्त ताकतीने चळवळ वाढवायची शपथ हेच लग्न. मात्र मग दोघांना ही बोचू लागली ते म्हणजे चळवळीतील असमान वागणूक. 


दूर जाण्याची भीती आणखी जवळ घेऊन आली


सर्व नेहमी प्रमाणे सुरू असताना विकास आणि राजेला एक मोठा धक्का बसला. चळवळीतल्या लोकांच्या हालचाली पाहून दोघांना ही शंका बळावू लागली की, त्यांना एकमेकांपासून वेगळे केले जाणार असून त्यांना दोन वेगवेगळी दलम किंवा कंपनी किंवा राज्यांमध्ये कामाला पाठवले जाणार. फारसे एकमेकात गुंतागुंत नको म्हणून लग्न जरी करून दिले, तरी ही नंतर त्यांना दूर करण्याची माओवाद्यांची जुनी रणनीतीच आहे. मात्र हे वाटताच, ताटातूट होण्यापेक्षा जीव धोक्यात घालून दोघे ही पळून आले. जगलो तरी एकत्र, मेलो तरी एकत्र आणि आत्मसमर्पण केले.