Loudspeakers Demand Rise : मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या भोंग्याच्या वादाने भोंगा विक्रेत्यांचे अच्छे दिन सुरू झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात भोंगे लावून हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर भोंग्याच्या विक्रीत वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. 


राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात भोंगे लावून हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन केल्यानंतरच्या काही दिवसात मनसे कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा लावण्यासाठी भोंग्यांची खरेदी सुरू झाली. त्यामुळे भोंग्यांची विक्री ३० ते ४० टक्के वाढली. ठाण्यातील उल्हासनगर मधील मार्केट भागात छोटे भोंगे ४०० रुपयांपासून ते मोठे भोंगे ९०० रुपयांपर्यंतच्या  किंमतीला विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दिल्ली शहरात या भोंग्यांचा सगळा पुरवठा होतो. 


एरवी लग्न समारंभ आणि सणांसाठी भोंग्यांची खरेदी होत होती. मात्र आता मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भोंगे खरेदीसाठी उल्हासनगर शहरात येत आहेत. भोंग्यांची विक्री वाढल्याने व्यापारी खुश आहेत.


अहमदनगरमध्येही विक्री वाढली


मनसेने हनुमान चालिसा पठण करण्याचे आवाहन करत नागरिकांना भोंग्याचेही वाटप सुरू केलंय. तर, दुसरीकडे कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने गावोगावी, जत्रा, यात्रा, हरिनाम सप्ताह आणि इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात भोंग्याची विक्री 30 टक्क्यांनी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. 


हनुमान चालीसा विक्रीची वाढ


तर दुसरीकडे हनुमान चालीसाचीही विक्री वाढली आहे. एरवी धार्मिक पुस्तकांच्या दुकानात न दिसणारे युवक हनुमान चालीसा खरेदीसाठी येत असल्याचे पुस्तक विक्रेते सांगतात.


युवकांचा कल हा या निमित्ताने का होईना धार्मिक पुस्तकांकडे वळला असल्याचे पुस्तक विक्रेत्यांनी म्हटले आहे. हनुमान चालिसा पठणावरून राजकिय पक्ष आपली पोळी भाजून घेत असले तरी युवकांनी त्याला बळी न पडता आपली संस्कृती कशी जोपासता येईल,आणि सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: