पुणे: वीकेण्डला लोणावळ्याचा पिकनिक प्लॅन करणार असाल, तर तुम्हाला तुमच्या प्लॅनमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. कारण शनिवार आणि रविवारी भुशी धरणाकडे तुम्हाला जायचं असेल तर दुपारी तीनपूर्वी जावं लागणार आहे.  तर पाच वाजता भुशी धरणावरून खाली उतरावे लागणार आहे.


पर्यटकांची वाहतूककोंडी आणि सुरक्षेच्या कारणास्तव लोणावळा पोलिसांनी वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी तीननंतर सर्वच वाहनांसाठी बंद ठेण्यात येणार आहे.

गेल्या आठवड्यात तब्बल पाच तास वाहतूक रखडली होती. ती सुरळीत करताना पोलिसांना अक्षरश: नाकी नऊ आलं होतं. त्यामुळं काही वर्षापासून पावसाळ्यात लागू करण्यात येणारे निर्बंध पुन्हा घालण्यात आले आहेत.

तर खंडाळा एक्झिटपासून अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत लोणावळ्यात प्रवेश बंदी असेल. तसेच मद्य सेवन आणि छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष पथक करडी नजर ठेवणार आहे.

पावसाळ्यात पर्यटकांची वाढती संख्या, वाहतूककोंडी, अपुरं पार्किंग लक्षात घेता लोणावळा पोलिसांनी शनिवारी, रविवारी तसेच इतर सुट्टीच्या दिवसांसाठी वाहतुकीचे नियोजन केले आहे.

कशी असेल वाहतूक व्यवस्था?

  • भुशी धरणाकडे जाणारा रस्ता दुपारी 3 नंतर रायवूड इथं बंद करणार

  • शनिवार आणि रविवारी अवजड वाहनांना लोणावळ्यात प्रवेश बंदी

  • वळवण आणि खंडाळा एंट्री पॉईंटजवळ अवजड वाहने रोखणार

  • पोलिसिंगसाठी 12 सेक्टरमध्ये बंदोबस्त

  • खंडाळा ते वळवण आणि भुशी धरण मार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत

  • ठिकठिकाणी सूचनाफलक

  • मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर गवळीवाडा परिसर ते भुशी धरण रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी

  • शहरात वाहनतळासाठीही दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत. त्यानुसार वाहनपार्किंग न केल्यास संबंधित गाडीवर कारवाई करणार


पोलिसांनी दिलेल्या या सूचनांचं पालन न केल्यास, तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.  त्यामुळे या नियमांचं पालन करा आणि तुमची पिकनिक आनंदी बनवा.