नाशिक पोलिसांची आयडिया, दहशत संपवण्यासाठी गुंडांची धिंड
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2017 12:30 PM (IST)
नाशिक: सर्वसामान्यांमधील गुंडांची दहशत कमी करण्यासाठी नाशिक पोलिसांनी नवी आयडिया आणली आहे. पोलिसांनी थेट गुंडांची धिंड काढण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी मंगळवारी रात्री कुख्यात गुंड शेखर निकमसह त्याच्या टोळीची पंचवटीतून धिंड काढली. निकम आणि त्याच्या टोळीची पंचवटीत मोठी दहशत आहे. गेल्या आठवड्यात संदीप लाड या व्यक्तीवर गोळीबार करून निकम टोळी फरार झाली होती. औरंगाबादमधून या टोळीला जेरबंद करण्यात आलं. ज्या परिसरात या टोळीची दहशत आहे त्या भागातून पोलिसांनी या गुंडांची धिंड काढली. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी यांच्यासमवेत निघालेली गुंडांची ही वरात पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. लाडवर ज्याठिकाणी गोळीबार केला, त्याठिकाणी ही धिंड नेण्यात आली. नागरिकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठीच ही धिंड काढल्याच पोलिसांनी म्हटलं आहे.