Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकींचा (Lok Sabha Election) शंखनाद कधीही होण्याची शक्यता आहे. अशातच निवडणुका अगदी तोंडावर आल्या असतानाही वंचित बहुजन आघाडीचा अद्यापही महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) समावेश झालेला नाही. मात्र, येत्या दोन-तीन दिवसात वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत (MVA) युती होईल, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.


महाविकास आघाडीत वंचितचा समावेश अद्याप झालेला नसल्यानं किंवा आघाडीत समावेश झाल्यानंतरही भंडारा लोकसभेची जागा वांचितला मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचं गाव असलेल्या साकोलीत वंचित बहुजन आघाडीची आदिवासी बहुजन अधिकार महासभा होत आहे. या सभेत स्वत: प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत. त्यामुळे या महासभेत प्रकाश आंबेडकर  (Prakash Ambedkar)  काय बोलतील याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


आंबेडकर 'एकला चलो रे' ची भूमिका घेणार?


महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतचा तिढा अद्याप कायम असतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. असे असतांना वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रभरात सभांचा धडाका लावला आहे. मार्चच्या पहिल्याच पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकरांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाच सभा होणार असून या सभांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाची मोर्चे बांधणीला देखील सुरवात केली असून संभाव्य उमेदवारांचे नाव जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आंबेडकरांनी स्वत: अकोल्यात स्वत:ची उमेदवारी जाहीर केलीय. तर वर्ध्यातून प्रा. राजेंद्र साळुंके, सांगलीतून 'डबल महाराष्ट्र केसरी' चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलंय.


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात महाविकास आघाडी  आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार की नाही, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरु असल्याच्या बातम्याही अधुनमधून येत होत्या. मात्र, मविआ आणि वंचितचे  जागावाटपाचे सूत्र निश्चित होऊ शकले नव्हते. परंतु, आता प्रकाश आंबेडकर यांनी परस्पर लोकसभेच्या तीन जागांवरील उमेदवार जाहीर करुन टाकले आहेत. त्यामुळे आता वंचित आणि मविआतील बोलणी फिस्कटल्याचे दिसत आहे. आता मविआला प्रकाश आंबेडकरांची मनधरणी करण्यात यश न मिळाल्यास 2019 प्रमाणे वंचित बहुजन आघाडी पुन्हा 'एकला चलो रे'च्या भूमिकेत दिसेल.


वंचित महाविकास आघाडीसोबत आली तर आवडेल- शरद पवार


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची सहा आणि सात मार्चला मुंबई येथे बैठक होणार असून या बैठकीत जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत आली तर त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्यायला आवडेल, असे व्यक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला चार ते पाच जागा देण्याबाबत देखील निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच राष्ट्रीय समाज पक्ष आमच्या सोबत आला, तर मी माझी माढा लोकसभेची जागा धनगर समाजास देण्यास तयार असल्याची तयारी देखील शरद पवार यांनी बोलतांना व्यक्त केलीय.  


इतर महत्वाच्या बातम्या