MVA Lok Sabha Seat Sharing Formula : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीचा  (MVA) फॉर्म्युला ठरला आहे. एकूण  48 जागांपैकी ठाकरे गट 21, राष्ट्रवादी 19 आणि काँग्रेस 8 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी चार जागा ठाकरे गट लढवेल तर प्रत्येकी एक जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असणार आहे.  


आगामी लोकसभा अवघ्या एका वर्षावर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 48 पैकी पाच ते सहा जागा अशा आहे ज्यावर महाविकास आघाडीमध्ये पूर्ण सहमती झालेली नाही. त्यामुळे या जागांमध्ये बदल होऊ शकतो. भाजपने देखील तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्लॅन केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपने यावेळी आपल्या रणनीतीमध्ये मोठा बदल केला आहे.   


कोणाला कोणत्या जागा हव्यात? 


काँग्रेसला गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला, नांदेड लातूर, सोलापूर, जालना, कोल्हापूर, पुणे, सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या दोन जागा हव्या आहेत. तर राष्ट्रवादीला  भंडारा - गोंदिया, बीड, शिरूर, बारामती, सातारा,माढा, कोल्हापूर, रावेर, अहमदनगर, दिंडोरी, रायगड, कल्याण  आणि मुंबईतल्या काही जागा हव्या आहेत.  तर शिवसेनेला आताच्या 18 जागा   मुंबईत एक जागा जास्त दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई. ईशान्य मुंबई या जागा हव्या आहेत.   त्यामुळे काही जागांवरुन वाटाघाटी होऊ शकतात. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर तडजोड ही करावीच लागेल.   एकला चलोचा नारा सोडला नाही तर भाजप एकहाती सत्ता पुन्हा मिळवेल.. 


2019 च्या लोकसभेचं गणित काय होतं? 


महाराष्ट्रात 48 जागांवर लोकसभेची निवडणूक होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2019 मध्ये 48 पैकी 23 जागा भाजपने जिंकल्या तर 18 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला. चार जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र आगामी निवडणुकीत भाजपने 45 जागांवर जिंकण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपची विशेष नजर असणार आहे. 


भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. मोदींची प्रत्येक योजना ही सामान्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आता इतर पक्ष आपलं गणित कसं लावतात आणि हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर सध्या प्रत्येक निवडणूक ही शिवसेना-भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे भाजपच्या रणनीतीनंतर शिवसेना काय करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.