मुंबई : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. देशभरात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली. भाजपच्या विरोधात इंडिया आघाडीनेही कंबर कसली आहे. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे दिसेतय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने लोकसभेच्या 23 जागांवर दावा ठोकलाय, पण काँग्रेस नेत्यांकडून या दावा फेटाळला आहे. त्याशिवाय काँग्रेसने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय, ही जागा कोणत्या परिस्थितीत सोडणार नसल्याचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सांगितलेय.
उत्तर मुंबई कुणाकडे जाणार ?
मुंबई उत्तर मतदारसंघात सध्या भाजपचा खासदार आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी विजय मिळवला होता. काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला होता. गोपाळ शेट्टी यांना 706678 इतकी मते मिळाली होती. तर उर्मिला मातोंडकर यांना 241431 मतांवर समाधान मानावे लागले होते. आता हा मतदार संघ कुणाकडे जाणार? याची चर्चा आहे.
संजय निरुपम काय म्हणाले ?
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केला. संजय निरुपम म्हणाले की, जागा वाटपामध्ये सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज करायला हवं. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी कुठल्याही प्रकारे काँग्रेस कॉम्प्रमाईज करणार नाही. कोणतेही परिस्थितीत ही जागा काँग्रेस लढेल.
ठाकरेंच्या 23 जागांचा प्रस्ताव काँग्रेसनं नाकारला -
संजय राऊत 23 जागांची लिस्ट घेऊन आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठांकडे गेले आहेत. ते जर एवढ्या जागा लढवणार असतील तर आम्ही काय करायचं? असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केलाय. वंचित बहुजन आघाडीने बारा जागांचे प्रपोजल दिलं आहे, अशा पद्धतीची बातमी मीडियामध्ये पाहिली. एवढ्या जागा ते घेणार असतील तर बाकीच्यांना काय करावे? हा माझा प्रश्न आहे? इंडिया आघाडीमध्ये तुम्ही येत आहात, मात्र जागांची मागणी करताना काळजी घ्या, असेही निरुपम म्हणाले.
अशोक चव्हाण यांनीही ठाकरेंची मागणी नाकारली -
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, इंडिया आघाडीमधील पक्षामध्ये एकी असणं गरजेचं आहे. प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्यात. पण सध्याच्या परिस्थितीमद्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची 23 जागांची मागणी खूप जास्त होतेय.
शिवसेना 23 जागांवर ठाम -
काँग्रेसकडून शिवसेना उद्धव ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीतील उमेदरांचा प्रस्ताव नाकारला. पण दुसरीकडे शिवसेना मात्र आपल्या जांगावर ठाम आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते अरविंद सावंत यांनी आम्ही 23 जागांवर ठाम असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आम्ही इंडिया आघाडीत राज्यातील 48 पैकी 23 जागांवर ठाम आहोत. मागील आणि त्याच्या मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या किती विजयी जागा होत्या ? मागच्या लोकसभा निवडणुकीत फक्त काँग्रेस एका जागेवर विजयी झालं. आणि ती जागा बाळू धानोरकर यांची होती, ती जागासुद्धा शिवसेनेची होती. आता त्यावरूनच तुम्ही समजून घ्या !! तुम्हाला किती जागा हव्यात?
या सगळ्यावर शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी खर्गे निर्णय घेतील यावर जास्त वाद घालायला नको. उत्तर मुंबई काय काँग्रेस सगळ्या जागा मागू शकतो, असेही अरविंद सावंत म्हणाले.