पंढरपूर : कोरोनामुळे सध्या आपत्कालीन यंत्रणा 24 तास काम करत असताना लॉकडाऊनमुळे त्यांच्याही जेवणाखान्याची आबाळ होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी पंढरपूरमधून असाच एक देवदूत समोर आला असून या सर्व यंत्रणेला तो नाश्ता आणि दोन वेळच्या गरम जेवणाचे डबे मोफत पुरवत आहे.
पंढरपूरमधील डीव्हीपी उद्योग समूहाचे मालक अभिजीत पाटी यांनी त्यांच्या हॉटेल विठ्ठल कामतमधून ही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. आपत्कालीन यंत्रणेतील डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस, होमगार्ड आणि यंत्रणेतील महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी येथे येऊन डबे घेऊन जातात. या सगळ्यांसाठी सकाळी दहापर्यंत चहा आणि नाश्त्याची पाकिटं इथे तयार असतात. यानंतर दुपारी बारा वाजल्यापासून पोळी, भाजी, भात असा डबे तयार होतात तर रात्री 8 वाजता रात्रीच्या जेवणाचा डबा तयार असतो.
यासाठी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला इतर उद्योगातील कामगारही दाखल झाल्याने अभिजीत पाटील यांच्यावरील ताण कमी झाला आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून संपेपर्यंत ही सेवा पुरवण्याचा निश्चय अभिजित पाटील यांनी केला असून सध्या 30 हजार लोकांना पुरेल एवढे समान भरुन ठेवले आहे.
प्रसिद्धीपासून दूर राहत पाटील यांनी ही सेवा सुरु केली आहे. लॉकडाऊन लांबला तरी सोलापूर जिल्ह्याला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या या आपत्कालीन यंत्रणेतील देवदूतांना काही कमी पडू देणार नसल्याचे पाटील यांनी सांगितलं. सध्या रोज दीड ते दोन हजार लोकांना जेवण देणारे अभिजीत पाटील लाखो रुपये खर्च करुन कोट्यवधींचे समाधान मिळवत आहेत.
Lockdown | पंढरपुरातील तरुण उद्योजकाकडून आपत्कालीन यंत्रणेला दोन वेळचे मोफत जेवण
सुनील दिवाण, एबीपी माझा
Updated at:
03 Apr 2020 12:06 PM (IST)
पंढरपुरातील तरुण उद्योजक अभिजीत पाटील यांनी एक आदर्श उपक्रम सुरु केला आहे. शहरात कोरोनाशी लढा देणाऱ्या आपत्कालीन यंत्रणेला नाश्ता आणि दोन वेळचे मोफत जेवण ते पुरवत आहेत. जवळपास 30 हजार लोकांच्या जेवणाची तयारी त्यांनी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -