सोलापूर : कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावताना सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन पोलिसांचा जीव गेला. या पोलिसांच्या संपर्कातील जवळपास 50 पोलिस क्वॉरन्टाईन करण्यात आलं. शहरातील सर्वाधिक रुग्ण याच हद्दीत आहेत. त्यामुळे पोलीस स्थानकातील निम्म्या यंत्रणेवरच काम करण्याचा ताण येऊ लागला. मात्र लोकांना सहभागी करुन कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात केला जात आहे.


सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यात शहरातील सर्वाधिक रुग्ण हे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर होते. मात्र ठाण्यातील पोलीसच कोरोना पॉझिटिव्ह निघाले आणि त्यात दोघांचा जीव देखील गेला. मात्र हिंमत न हरता एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी जनतेलाच या कामात सहभागी करुन घेतलं. प्रत्येक नगर, गल्ली, वस्तीत जाऊन पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आणि स्वत:हून जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले.



पोलिसांच्या या आवाहनाला लोकांनी देखील तितक्याच सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक कोरोना वॉरिअर्स म्हणून पोलीस प्रशासनाच्या मदतीला आहे. आपल्या गल्लीतील कोणी बाहेर जाणार नाही. बाहेरचे नागरिक कोणी येणार नाही याची खबरदारी लोक स्वत:हून घेत आहेत. नागरिकांना आठ दिवसासाठी लागणारा भाजीपाला, जीवनावश्यक साहित्यांची खरेदी करुन ठेवली. त्यामुळे शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शिथिलता असली तरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोक बाहेर पडत नाहीत. परिसरातील काही भागात दोन ते तीन दिवसांपासून कर्फ्यू सुरु आहे. पोलिसांनी जनतेला ३१ मेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केलं. त्यानुसार लोक स्वत:हून कर्फ्यू पाळत आहेत. पोलिसांनी कोणतीही सक्ती केलेली नसताना लोकांचा हा अभूतपूर्व प्रतिसाद या भागात मिळत आहे.



एमआयडीसी परिसर हे मोठं औद्योगिक क्षेत्र आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मजूर आणि कामगारांच्या वस्ती आहेत. त्यामुळे या परिसरात दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार या भागात झपाट्याने होत आहे. त्यामुळे लोक स्वत:हून या कर्फ्यूमध्ये सहभागी होत असल्याने साखळी तोडण्यास मदत होणार आहे. तसेच पोलिस यंत्रणांवरील देखील ताण कमी होण्यास मदत होत आहे.