मुंबई : कोरोना संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे सोबत असल्याची ग्वाही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. राहुल गांधी आणि मुख्यमंत्री यांच्यात काल (27 मे) फोनवरुन चर्चा झाल्याचं कळतं. यावेळी सरकारसोबत असल्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी मुख्यंत्र्यांना दिलं.

"महाराष्ट्रात काँग्रेसचा सरकारला पाठिंबा आणि पण आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही," असं वक्तव्य राहुल गांधी यांनी काल केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन संवाद साधून सगळं काही आलबेल असल्याचं अधोरिखित करण्याचा प्रयत्न केला.

24 तासांच्या आत तातडीने संवाद होणं आणि काँग्रेस-शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकमेकांच्या थेट संवादात असणं हे दाखवून महाराष्ट्र सरकारमध्ये संभ्रमाचं वातावरण नाही. तीनही पक्ष एकमेकांच्या संपर्कात आहेत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील हा संवाद महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेत सुरुवातीला राहुल गांधी फारसे उत्सुक नसल्याचं दिसत होतं. शिवसेनेकडूनही सोनिया गांधी यांच्याशीच संवाद साधला जात होता. मात्र आता राहुल यांनी आता थेट संपर्क करुन संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे.

राहुल गांधी काय म्हणाले होते? "कोरोनाचा महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. आमचा महाराष्ट्र सरकारला पाठिंबा आहे, पण महाराष्ट्रात आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, पुद्दुचेरीमध्ये आम्हाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा यातील हा फरक आहे. महाराष्ट्रात तिथल्या रचनेमुळे परिस्थिती बिकट बनली आहे. महाराष्ट्र हे उद्योगाच्या दृष्टीने देशासाठी महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्र सरकारचं पूर्ण सहाय्य मिळणं गरजेचं आहे. मी समजू शकतो की महाराष्ट्र सध्या मोठं युद्ध लढतोय. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील लोकांना केंद्राचं पूर्ण सहकार्य मिळावं," असं राहुल गांधी म्हणाले होते.

Maharashtra Politics| महाविकास आघाडीचं सरकारबद्दला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य