अलिबाग (रायगड) : ‘लिटल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमातून आपल्या आवाजाने सर्वांना मोहून टाकणाऱ्या रायगड जिल्ह्यातील मुग्धा वैशंपायन बारावीच्या परीक्षेत 63 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
‘लिटल चॅम्प’ कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील लहानग्या मुग्धाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. ‘लिटल चॅम्प’च्या अंतिम फेरीत स्थान मिळवलेल्या मुग्धाने यंदा बारावीची परीक्षा दिली होती.
दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण अलिबाग येथे घेणाऱ्या मुग्धाने बारावीसाठी मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिकत होती.
अभ्यासात हुशार असलेल्या मुग्धाने दहावीच्या परीक्षेत 94.20 टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर विज्ञान विषयाची आवड असल्याने मुग्धाने हट्टाने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. यापुढेही विज्ञान शाखेतूनच पदवी परीक्षा देण्याचा मानस असून, तिला शास्त्रीय संगीतात करियर करायचे आहे.
अभ्यासासोबतच संगीताची आवड असलेल्या मुग्धाबद्दल तिच्या आईला देखील अभिमान वाटत असून, तिने तिचे अभ्यासासोबतच स्वप्न पूर्ण करावे असे म्हणणे आहे.