ठाणे : दोन वर्षांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकलेले ठाण्यातील सतीश आपटे आणि लिसा आपटे हे दाम्पत्य आठवतंय का? सतीश आपटे आणि लिसा एकाएकी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. याला कारण ठरलं त्यांचं वय. दोघांच्या वयामध्ये 39 वर्षांचं अंतर आहे. लग्न झालं तेव्हा सतीश आपटे यांचं वय होतं 58 वर्ष तर लिसा होती अवघ्या 20 वर्षांची. लग्नानंतर त्यांचा सेल्फी सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला होता.


सतीश-लिसाच्या स्टोरीमध्ये ट्वीस्ट
मात्र सतीश आणि लिसा यांच्या स्टोरीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. लिसाने दुसऱ्या व्यक्तीशी विवाह केल्याचं दावा सतीश आपटे करत आहेत. इतकंच नाही तर नौपाडा पोलिसांनी 23 वर्षीय लिसाला समन्स बजावला आहे.

सतीश आपटे अजूनही लिसाचा शोध घेत आहेत. "ती गुजरातमध्ये असून तिने दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केलं आहे. हे मी पोलिसांना अनेकवेळा सांगितलं. पण पोलिस म्हणतात की, तिला परत यायचं नाही आणि ते जबरदस्तीने तिला आणू शकत नाहीत. मात्र तिला जेलमध्ये टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही," असं सतीश आपटे म्हणाले.

"मी लिसाला घरी नेण्यास तयार आहे. ती अजूनही माझी पत्नी आहे. आमचा घटस्फोट झालेला नाही. पण तिला शिस्त लागावी यासाठी तिला पहिल्यांदा अटक होणं गरजेचं आहे," असंही सतीश आपटे म्हणाले.

58 वर्षांचा नवरा आणि 20 वर्षांची नवरी, लग्नाचा सेल्फी व्हायरल!

महिन्याभरातच कुरबूर आणि भांडण
पण लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच लिसा सतीश आपटेंना सोडून घरातून निघून गेली. यानंतर लिसा बेपत्ता असल्याची तक्रारही आपटेंनी पोलिसांत दाखल केली होती.

बहिणीने संसारात विष कालवलं : सतीश आपटे
लग्नानंतर लिसाची अमृता झाली. पण तिची बहिण मोनिकाने आमच्या संसारात विष पेरलं. शिवाय तिने लिसाला घर सोडण्यासाठी प्रवृत्त केलं. मोनिकाने लिसाचे दागिनेही घेतले, असा आरोप सतीश आपटे यांनी केला होता. दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर महिनाभरापूर्वी तिला फसवणूक आणि विश्वासघाताप्रकरणी अटक करण्यात आली.

लग्नासाठी आपटेंनी ब्लॅकमेल केलं: लिसाची बहिण
तर दुसरीकडे लिसा आठ वर्षांची असताना सतीश आपटेंनी तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. तसंच लिसाला लग्नासाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.

सतीश आपटे हे लिसा आणि मोनिकाच्या वडिलांकडे कामाला होते. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या संपत्तीची देखरेख करत होते.

'लिसाच्या कुटुंबीयांनी मलाही त्रास दिला'
सतीश आपटे म्हणाले की, "लिसाच्या कुटुंबीयांनी तिला खूप त्रास दिला. उलट मी तिच्याशी लग्न करुन तिला रिमांड होममधून बाहेर काढलं. आम्ही चांगले मित्र आहोत. मला माहिताय तिचं माझ्यावर प्रेम आहे. पण आम्ही वेगळं होण्यामागे तिचं कुटुंब आहे. मागील दोन वर्षांत त्यांनी मला फार त्रास दिला आहे."