New Army Chief : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Manoj Pande) हे देशाचे नवे लष्करप्रमुख (Chief of the Army) असतील. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने नुकताच हिरवा कंदील दर्शविला आहे. मनोज पांडे यांच्या नियुक्तीमुळे भारतीय लष्कराला एका पाठोपाठ एक दोन मराठमोळे लष्करप्रमुख लाभले आहेत. सध्याचे लष्करप्रमुख मनोज नरवणे हे देखील मराठमोळे असून ते या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुख्यपदी नियुक्ती होणार आहे. जनरल मनोज पांडे हे लहानपणापासूनच अभ्यासासह क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट होते होते, अशी आठवण त्यांचे लहानपणीचे मित्र दिलीप आठवले सांगतात.
जनरल मनोज पांडे आणि दिलीप आठवले हे बाल मित्र आहेत. बालवाडीपासून हे दोघे जण एकत्र होते. जनरल मनोज पांडे आणि दिलीप आठवले यांनी गेल्या 57 वर्षांपासून आपली मैत्री जपली आहे. जनरल मनोज पांडे हे मित्रांच्या समुहात खोडकर म्हणून ओळखले जात असत. नेहमीच सर्वांना हसवणारे आणि मैत्री निभावणारे मित्र म्हणून आजही त्यांची ओळख कायम आहे. एवढेच नाही तर मनोज पांडे एके दिवशी सर्वोच्च पदावर पोहोचतील याबद्दल शंका नव्हतीच, असे दिलीप आठवले सांगतात.
"जनरल मनोज पांडे यांना मागील तीन पोस्टिंग अत्यंत आव्हानात्मक भेटल्या. याबरोबरच त्यांचा लडाख आणि चीन सोबतच्या सीमेवरील प्रचंड अनुभव आणि अभ्यास आहे. त्यामुळे ते भारताच्या लष्करप्रमुख पदापर्यंत पोहोचतील असा विश्वास आम्हा सर्व मित्रांना होता, असे दिलीप आठले यांनी सांगितले.
जनरल मनोज पांडे यांचे वडील नागपूर विद्यापीठाच्या सायकॉलॉजी विभागाचे विभाग प्रमुख कार्यरत होते. तर त्यांच्या आई आकाशवाणीमधील प्रसिद्ध कार्यक्रम मधुमालतीच्या प्रख्यात उद्घोशिका होत्या. त्यांचे वडीस सध्या 85 वर्षांचे असून आईचे निधन झाले आहे. मनोज पांडे नागपूरमधील केंद्रीय विद्यालयात अकरावीपर्यंत शिकले. त्यानंतर त्यांची एनडीएसाठी निवड झाल्यानंतर ते एनडीए मध्ये गेले. एनडीएनंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडेमीमध्ये प्रवेश घेतला. तिथे टॉपर असल्यामुळे त्यांना इंग्लंडच्या सैन्य महाविद्यालयातही शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली.
जनरल मनोज पांडे आज उच्च पदी असले आजही त्यांची नागपूर आणि महाराष्ट्राशी नाळ जोडलेली आहे. नागपूरमध्ये आल्यानंतर ते जुन्या मित्रांना भेटण्याचा प्रयत्न करत असतात. याबरोबरच शालेय जीवनातील मित्र सध्या कोठे आहेत? आणि काय करतात याची चे आवर्जून चौकशी करतात अशा आठवणी दिलीप आठले यांनी सांगितल्या.
जनरल मनोज पांडे यांच्या नेतृत्वात भारतीय लष्कर नवी उंची गाठेल आणि भारताची सुरक्षा आणखी भक्कम होईल असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या