Maharashtra Drug Cases : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणं खूप गाजत आहेत. अशातच आता एनसीबीच्या डीजींनी राज्याच्या डीजींपीना पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यातील महत्त्वाच्या पाच ड्रग केसेस एनसीबीकडे वर्ग करण्याचे गृहमंत्री अमित शाह यांचे आदेश असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतर एनसीबीच्या डीजींकडून केसेस वर्ग करण्यासाठी राज्याच्या डीजीपींना पत्र पाठवण्यात आलं आहे. एनसीबीच्या पत्रानंतर पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सामना रंगण्याची शक्यता आहे. एनसीबीच्या या पत्राची प्रत'एबीपी माझा'च्या हाती लागली असून आता राज्य सरकार ड्रग्जच्या हायप्रोफाईल केसेस एनसीबीकडे देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या महासंचालकांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना 2 डिसेंबर रोजी पत्र पाठवलं होतं. या पत्रात NCB ला तपासासाठी कोणत्या केस पाहिजेत, त्याबाबत काहीच सांगण्यात आलेलं नाही. त्यासोबतच मुंबई ANC कडे असलेल्या महत्त्वाच्या प्रकरणांपैकी तीन ते पाच प्रकरणं एनसीबीकडे वर्ग करण्यात यावी, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. एनसीबीच्या महासंचालकांनी पाठवलेल्या पत्राला DO लेटर म्हणजेच, डेमी ऑफिशिअल म्हटलं जातं. मुंबई पोलिसांनी अद्याप या पत्राबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. कारण या पत्रात NCB ला नक्की काय अपेक्षा आहेत, याबाबत काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. तसेचल मुंबी पोलीस याप्रकरणावर चर्चा करणार असून त्यानंतरच पुढे काय करायचं, हे ठरवलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 


सुत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ANC कडे जेवढी प्रकरणं आहेत. त्यापैकी 70 ते 80 टक्के प्रकरणांची मुळं दुसऱ्या राज्यांशी जोडलेली आहेत. दरम्यान, NCB कोणतंही प्रकरण थेट तपासासाठी स्वतःकडे घेऊ शकत नाही. त्यामुळे एनसीबीनं बहुतांश राज्यांना ड्रगशी निगडीत प्रकरणं एनसीबीकडे वर्ग करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. 


'पैसे उकळण्यासाठीचं राज्य सरकारच्या केसेस NCB स्वतःच्या ताब्यात घेत आहे', नवाब मलिक यांचा केंद्राला टोला


राज्यात पुन्हा एकदा एनसीबी विरुद्ध एनसीपी (NCB vs NCP) असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण राज्य सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईतील 5 महत्त्वाच्या केसेस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amir Shah) यांच्या आदेशानुसार एनसीबी आपल्या ताब्यात घेणार आहेत. तसं पत्र एनसीबीच्या महासंचालकांनी यांनी राज्याच्या महासंचालकांना लिहिले आहे. यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशाने 'आपण तात्काळ नमूद केलेल्या 5 केसेस एनसीबीकडे वर्ग कराव्यात' असं लिहिण्यात आलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली देत केंद्रावर निशाणा साधला आहे.


 संबधित सर्व प्रकरणावर बोलताना नवाब मलिकांनी काही प्रश्न विचारले आहेत. एनसीबीच्या महासंचालकांनी एक पत्र 24 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या महासंचालकांना लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की, अमित शाह यांच्या आदेशानुसार राज्याच्या अँटीनार्कोटिक्स सेलने ज्या 5 महत्त्वाच्या टॉप केसेस केलेल्या आहेत. त्या एनसीबीला तात्काळ हस्तांतरीत करण्यात याव्यात. एनसीबीच्या महासंचालकांच्या पत्राच्या अनुषंगाने अमित शाह यांना सवाल विचारताना मलिक म्हणाले, 'त्यांनी एनसीबीला दिलेल्या आदेशात ज्या पाच केसेस नमूद केल्या आहेत. त्या केसेसचे निकष काय आहेत. एनसीबीने कारवाई केलेल्या छोट्या केसेस की राज्याच्या युनिटने हस्तगत केलेल्या 3 टन ड्रग्जसारख्या मोठ्या केसेस आहेत, हे असं बोलत मलिकांनी एनसीबीसह केंद्र सरकारला टोला दिला आहे. एनसीबीपेक्षा अधिक काम राज्याच्या अँन्टी नार्कोटिक्स विभागाने केलं आहे. संबधित पाच केसेसच्या माध्यमातून एनसीबीचा पैसे उकळण्याचा धंदा सुरु आहे, असाही आरोप मलिकांनी केला आहे.


बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चव्हाट्यावर


गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळी ड्रग्ज प्रकरणं चर्चेत आली होती. यामध्ये प्रामुख्यानं बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण चव्हाट्यावर आलं होतं. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीवेळी बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. यावेळी अनेक सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आले होते. तसेच अनेक बड्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांची चौकशीही करण्यात आली होती. तसेच काही सेलिब्रिटींना ड्रग्ज प्रकरणी अटकही करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातही बॉलिवूड आणि ड्रग्ज संबंध चव्हाट्यावर आले होते. या प्रकरणात बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. सध्या आर्यन जामीनावर बाहेर आहे. 


बॉलिवूडमध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या नावाची दहशत 


बॉलिवूडमध्ये समीर वानखेडे या नावाची वेगळी दहशत आहे. समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंसीसह पकडलं होतं. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमनं अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे मारले आहेत. मुंबईमध्ये ड्रग्सचा नायनाट करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांचा केंद्रीय गृह विभागाकडून विशेष पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांच्यासह भारतातील 152 आणि महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला होता.