पुणे : महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदापासून राज्यशास्त्र हा विषय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात भाजप आणि शिवसेनेचे गुणगान करण्यात आलं आहे तर अप्रत्यक्षपणे कॉँग्रेसवर तसेच कम्युनिस्ट पार्टीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


या पुस्तकामध्ये राजकीय सद्यस्थिती, तसेच पक्षांबाबतचे उल्लेख आहेत. त्यातील काही उल्लेखांवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असून प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर पक्षाचा भर आहे,' असा उल्लेख करण्यात आला आहे.

तर शिवसेना हा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन व परप्रांतीयांना विरोध करण्यासाठी झाली आहे. विशेष म्हणजे ही माहिती धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हासह भगव्या रंगात छापण्यात आली आहे.

दरम्यान, दहावीच्या राजकीय अभ्यासक्रमावरुन काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली आहे.