अकोला : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, या दौऱ्यात चर्चा झाली ती त्यांनी घेतलेल्या 'शेतकरी समस्या निवारण मेळाव्या'कडे शेतकऱ्यांनी फिरवलेल्या पाठीची.


सदाभाऊंच्या रयत संघटनेच्या वतीने मूर्तीजापूर तालुक्यातील कानडी येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्याकडे शेतकऱ्यांनीच पाठ फिरवल्याने सदाभाऊंची मात्र पार गोची झाली.

याच सभेत सदाभाऊंनी भीमा-कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची जोरदार पाठराखण केली. ही परिस्थिती हाताळण्यास मुख्यमंत्री अपयशी ठरल्याची टीका होत असताना खोतांनी फडणवीसांच्या बाजूने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती सावरण्यासाठी योग्य पावले उचलल्याचं खोत म्हणाले.

सभेनंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणामागे भाजपचा हात असल्याचा आरोप करणाऱ्या स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांवर बोचरी टीका केली. तुपकर हे नेहमीच चर्चेत राहण्याससाठी भडक वक्तव्य करतात. त्यांची राजकीय उंची मोठी नसल्याचं सांगतांना त्यांनी तुपकरांचा उल्लेख 'टपोरी' असा केला. पारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे, अशा खोचक शब्दात खोत यांनी तुपकरांवर टीका केली.

सध्याच्या भाजप सरकारने यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने दिली नव्हती, त्यापेक्षा अधिक कर्जमाफी शेतकऱ्यांना दिल्याचं खोत म्हणाले.

दरम्यान, विरोधकांच्या हातात कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते उठसूठ सरकारवर टीका करत असल्याचं सदाभाऊ म्हणाले.