धुळे : महाराष्ट्र बंदचा एसटीला जोरदार फटका बसला आहे. महाराष्ट्र बंदमुळे एसटीला तब्बल 20 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. आर्थिक नुकसान झालं असलं तरी, आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत एसटीचं झालेलं नुकसान आंदोलनकर्त्यांकडून न घेता एसटी स्वत: सोसेल, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे.


आंदोलनात सलग दोन दिवस एसटीच्या 217 बसेसची मोडतोड झाली. त्याचे सुमारे 1 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तसेच या बंद काळात 250 आगारांपैकी 213 आगारक्षेत्रीतील बहुतांश एसटीची वाहतूक ठप्प झाल्यामुळे 19 कोटी रुपयाचा महसूल बुडाला.

हे झालेलं नुकसान भरून न निघणारं असून आंदोलन काळात तोडफोड झालेल्या बसेस भविष्यात दुरुस्त होऊन रस्त्यावर सुरळीत धावेपर्यंत एसटीला तिच्या दैनंदिन महसूला पासून वंचित राहावं लागणार आहे. त्याचा सध्या स्थितीला अंदाज वर्तविणं कठीण आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

भीमा-कोरेगाव इथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.