पंढरपूर : बारामती या नावात बरीच मोठी जादू आहे त्यामुळे बारामतीने लक्ष घातले की अवघडातले अवघड विषयही सुतासारखे सरळ झालेले दिसतात मग तो राजकीय असो अथवा कोणताही ... आता हे बोलायचे कारण म्हणजे जालना, औरंगाबाद, बीड, आणि नगर जिल्ह्यातून 9 जणांचे बळी घेऊन आलेला हा सोनबा बारामतीचा शार्प शूटर करमाळ्यात येताच गायब झाला आहे .


आता तुम्ही म्हणाल हा सोनबा कोण? तर जालण्यापासून कारमाळ्यापर्यंत 12 जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचे नामकरण वनविभागाने सोनबा म्हणून केल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. हा सोनबा उर्फ नरभक्षक बिबट्या साधारण 3 डिसेंबरला करमाळा परिसरात आला आणि पाहता पाहता त्याने या भागात 3 बळी घेऊन बळीचा आकडा 12 वर पोचवला . यामुळे करमाळा परिसरात या नरभक्षक बिबट्याची मोठी दहशत तयार झाली आहे. शासनाकडून त्याला गोळ्या घालण्याचे आदेश निघाल्यावर वन विभाग शार्प शुटर आणि फौजफाट्यासह करमाळा परिसरात दाखल झाला. रोज विविध प्रकारचे ट्रॅप लावण्यात आले. वेळ पडल्यावर त्याला कोंडीत पकडण्यासाठी कधी फडातील ऊस पेटवला तर कधी जेसीबीने ऊस आडवा केला मात्र तरीही हा बिबट्या वनविभागाला सातत्याने गुंगारा देत धुमाकूळ घालत राहिला होता. त्याच्या शोधासाठी नाशिकच्या वन अधिकाऱ्याने खास बिबट्याच्या शोधासाठी तयार केलेले दोन स्निफर डॉगचे स्कॉड देखील आणले. या बिबट्यावर चिखलठाण व बिटरगाव या दोन ठिकाणी शार्प शुटरकडून केलेले फायरही त्याने चुकवत पलायन केले होते. या सैराट झालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला सातत्याने अपयश येत असल्याने खासदार रणजित निंबाळकर यांनी वनविभागाला बिबट्याच्या शोधासाठी हेलिकॉप्टर देण्याची तयारी दाखवली. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आणि बिबट्याला जायबंदी करण्यासाठी वन विभागाच्या मदतीला बारामती येथील अव्वल दर्जाचे नेमबाज हर्षवर्धन तावरे यांच्या नावाचे आदेश काढले.


गंमत अशी की हे आदेश निघाले आणि ज्या दिवशी बारामती येथून तावरे आपल्या बंदुकीसह करमाळ्यात बीटरगाव वांगी परिसरात उतरले त्या दिवशीपासून हा बिबट्या गायब झाला आहे . रोज विविध ठिकाणच्या तपासण्या केल्या जात असल्या तरी या बिबट्याच्या कोणत्याही खाणाखुणा या चार दिवसात समोर न आल्याने वन विभाग देखील चकित झाला आहे. बिटरगाव येथे बिबट्याचा हल्ला फसल्यावर वन विभागाने या ठिकाणी पुन्हा बिबट्याला चारी बाजूने वेढला व त्याच्यावरर फायर केले होते मात्र यातून पुन्हा हा बिबट्या निसटला पण त्यानंतर मात्र त्याचा मागमूसही मिळालेला नाही .


यानंतर गेल्या चार पाच दिवसात बिबट्याबाबत वेगवेगळ्या ग्रामस्थांकडून बिबट्या पाहिल्याचे फोन येत असले तरी वन विभागाच्या तपासणीनंतर त्याचे पुरावे मात्र मिळालेले नाहीत. आता बिबट्याच्या प्रवासात दक्षिणेला उजनीचे बॅक वॉटर आल्याने त्याचा प्रवास थांबला असून तो सध्या वांगी परिसरातच असला तरी कोणत्याही पाळीव प्राण्यावर अथवा जंगली प्राण्यावर हल्ल्याची पुस्ती झालेली नाही. यामुळेच आता वन विभाग विचारात पडला असून त्यांनी कंदर, उंदरंगाव अशा परिसरातल्या गावात नव्याने पिंजरेही लावले आहेत, पण बिबट्या सध्या बाहेर यायलाच तयार नाही. यामुळेच बिबट्याबाबत तर्कवितर्क वाढू लागले असून ताणतणाव आणि डी हायड्रेशनमुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता बोलली जात आहे . करमाळा परिसरात काटेरी साळींदरसारख्या प्राण्यावर हल्ला करताना त्याच्या जबड्याला जखम झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच माणसावर केलेल्या हल्ल्यात त्याने मानवी शरीराचा केवळ मऊ भाग खाऊन पलायन केले होते. बिटरगाव येथे ट्रॅप मधून पळून जातानाही या बिबट्याची आक्रमकता खूपच कमी झाल्याचे दिसत होते . आता यातच बारामतीचे शार्प शूटर हर्षवर्धन तावरे गेल्या चार दिवसापासून वन विभागाच्या मदतीने सगळा परिसर तपासात असताना बिबट्याचे कोणताही मागमूस न लागल्याने बारामतीच्या नावाने बहुदा बिबट्या बिळात दडून बसला की काय असा सवाल आता परिसरातील ग्रामस्थ करू लागले आहेत.