सोलापूर : मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही राज्यातील 12 कोटी समाजाचे नेतृत्व करीत असून आम्ही 60 टक्के ओबीसीने तुम्हाला मते दिली आहेत. तुम्ही सगेसोयरेंचा अध्यादेश काढू नका, अन्यथा आम्ही राज्यातील सर्व ओबीसी मुंबईत येऊन मुंबई जाम करू असा इशारा प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला. एकाबाजूला उद्या मनोज जरांगे यांना दिलेल्या शब्दानुसार सगेसोयरेंबाबत मुख्यमंत्र्यांना हा अध्यादेश काढण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार असताना आता ओबीसी समाजाने दिलेल्या हा इशाऱ्यामुळे सरकार पुढील अडचणी वाढणार आहेत. 


सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून करा


मनोज जरांगे हे रोज आपल्या मागण्या बदलत असतात यावरून बोलताना आज लक्ष्मण हाके यांनी थेट मनोज जरंगे याना ऑफर दिली. जरांगे तुम्हाला 288 आमदार पाडायचे आहेत, तर सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून करून शेवट सांगोलामधील शहाजीबापू यांच्यापर्यंत करा. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत असे सांगितले. हे सर्व पडायलाच पाहिजे, नव्या दमाचे चळवळीतील सर्वसामान्य तरुणांना विधानसभेत पाठवायचे असेल तर या सर्व 288 आमदारांना पाडले पाहिजे. आरक्षण भूमिका मांडणारे तरुण निवडून गेले पाहिजेत, असे म्हणत हाके यांनी जरांगे यांच्या सुरात सूर मिसळला. 


आज लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे दोन्ही नेते सांगोला तालुक्यात आले असता त्यांचे येथील ओबीसी बांधवानी फटाके फोडत आणि हलग्यांच्या कडकडाटात जोरदार स्वागत केले. सांगोला हा हाके यांचा तालुका असून ते आज आपल्या गावाकडे आईवडिलांना भेटायला जाताना सांगोला येथे थोडा वेळ थांबले होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


सगेसोयरे बाबत निर्णय घेऊ नका


एबीपी माझाशी बोलताना हाके यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सगेसोयरे बाबत निर्णय घेऊ नका असे आवाहन केले. अन्यथा आम्हालाही चलो मुंबई असा नारा द्यावा लागणार असून राज्यातील लाखो ओबीसी समाज मुंबई जाम करेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. बीडमधील सभेत बोलताना काल जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर उभे राहून अठरा पगड जातीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर ज्या अश्लाघ्य भाषेत वक्तव्ये केली त्याचा आम्ही निषेध करतो. आमच्या अठरा पगड जातीचे आरक्षण टिकावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या भुजबळ यांचेवर कोणी असे शिवराळ भाषेत टीका करीत असेल तर आम्ही महाराष्ट्रातील सगळी माणसे एकत्रित येत असल्याचा इशाराही जरांगे याना दिला.  


जरांगे यांना 288 जागा लढवायच्या असतील तर त्यांनी लढवून बघाव्यात असेही आव्हान हाके यांनी दिले. महाराष्ट्राची सुसंस्कृत ओळख पुसायचे काम करणारे अनेक हिटलर होऊन गेले. मात्र, येथील जनता सुज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री हे राज्यातील 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री असून आम्ही 60 टक्के ओबीसी समाजानेही मतदान केले आहे . त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व जातीचा कैवार घेऊन सगेसोयरेंचा अध्यादेश काढू नये, तरीही हा अध्यादेश काढला तर आम्ही मुंबईत येऊ, सगळ्या ओबीसींना मुंबईत बोलावू आणि मुंबई जाम करू असा इशाराही हाके यांनी दिला.


इतर महत्वाच्या बातम्या