पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली. लक्ष्मण हाके यांनी दारु प्यायली असल्याचा मराठा आंदोलकांनी दावा केला. लक्ष्मण हाके हे पुण्यातील खुल्या पटांगणावर दारू प्यायला बसले होते, तेव्हा त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. या प्रकरणी लक्ष्मण हाकेंची मेडिकल चाचणी करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. 


यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी दिसतात. त्यामध्ये लक्ष्मण हाके यांना त्यांचे सहकारी धरून नेत असल्याचं दिसतंय. या वादानंतर दोन्ही बाजूचे लोक कोंढवा पोलिस ठाण्यात पोहचले असून एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करणे सुरु आहे. लक्ष्मण हाके यांची मेडिकल टेस्ट करण्याची मराठा आंदोलकांनी मागणी केली आहे. तर मराठा आंदोलकांनी आपल्याला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. 


लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायल्याचा दावा


एका मराठा आंदोलकाने सांगितलं की, लक्ष्मण हाके हे पुण्यातील खुल्या पटांगणामध्ये दारू प्यायला बसले होते. त्यावेळी त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी मराठा आंदोलकांसोबत वाद घातला. त्यावेळी लक्ष्मण हाके यांना साधं उभारताही येत नव्हतं.  लक्ष्मण हाके यांनी मराठा बांधवांना शिवीगाळ केली. त्यांनी मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपतींबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोपही त्या  आंदोलकाने केला. 


दुसऱ्या एका आंदोलकाने म्हटलं की, लक्ष्मण हाके यांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी त्यांना बसवून घेतलं. यामध्ये पोलिस वेळकाढूपणा करत आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर, त्यांच्या शरीरातून दारूचा अंश निघून जाईपर्यंत त्यांची मेडिकल टेस्ट करावी. मग सत्य बाहेर येईल. 


हे प्रकरण सध्या पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये आहे. लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायली असून त्यांची मेडिकल टेस्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. तर आपल्याला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक आरोप केला जात असल्याचं हाके यांनी म्हटलं. नंतर दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी कोंढवा पोलिस ठाण्यात झाली. 


काय म्हणाले होते लक्ष्मण हाके संभाजीराजेंबद्दल? 


मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण सुरू असताना त्या ठिकाणी संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली होती. त्यावरून लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "संभाजीराजे, तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू राजांचे आणि शिवरायांचे देखील वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही."


संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यावरून मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातूनच पुण्यातील ही घटना घडली असल्याची माहिती आहे. 



ही बातमी वाचा: