लातूर : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर लातूर महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच वेळ अमावस्या सारखा सण आल्याने राजकीय नेत्यांना आणि इच्छुक उमेदवारांना कार्यकर्ते, मतदार आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची आयती संधी मिळाली आहे. उबदार थंडी, चविष्ट वनभोजन आणि जोडीला राजकीय चर्चांनी यंदाची वेळ अमावस्या विशेष रंगतदार ठरली आहे.
वेळ अमावस्या हा लातूर, धाराशिव आणि सोलापूर पट्ट्यात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण
वेळ अमावस्या हा लातूर, धाराशिव आणि सोलापूर पट्ट्यात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण. मात्र ‘लातूर पॅटर्न’मध्ये या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख हे आवर्जून या परंपरेचे पालन करत होते. ते सहकुटुंब कार्यकर्ते नेत्यासह वनभोजन आनंद घेत होते.याच ठिकाणी मित्रपरिवार, कार्यकर्ते, सहकारी आणि समर्थक यांच्या भेटीगाठी, गप्पा आणि चर्चांमधूनच लातूरचे राजकारण अनेकदा आकार घेत असल्याचे चित्र दिसून येत असे.
यंदा मात्र चर्चेचा केंद्रबिंदू एकच - महानगरपालिका निवडणूक!
दुपारनंतर लातूर शहरातील मुख्य बाजारपेठा आणि गल्लीबोळ अक्षरशः ओस पडले होते. शक्य तिथे लातूरकर सहकुटुंब शेताकडे वळताना दिसून आले. शेतशिवारात मात्र गर्दी, हास्य, गप्पा आणि चर्चांचा गजबजाट होता. लातूर महानगरपालिकेच्या 18 प्रभागांतील 70 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत. प्रभागनिहाय मोर्चेबांधणी, कोण आपला कोण परका याची चाचपणी सुरू आहे. अशात वेळ अमावस्या म्हणजे इच्छुकांसाठी राजकीय सुवर्णसंधी ठरली आहे.
वेळ अमावस्येच्या उत्साहात राजकारणाची खमंग फोडणी
घरगुती स्वरुपात साजरा होणारा सण यंदा अनेक ठिकाणी थेट इव्हेंट बनल्याचे चित्र आहे. मंडप, खुर्च्या, टेबल्स, आग्रहाचे आमंत्रण आणि प्रभागातील कार्यकर्त्यांची हजेरी सगळं काही नियोजनबद्ध मानाच्या भोजनात उंडे, आंबील, भजी, ज्वारी-बाजरीच्या भाकऱ्या, थालीपीठ, धपाटे, चटण्या, गव्हाची खीर यांच्यासोबत आता गुलाबजाम, जिलेबी, तिखटपुरी, पालकपुरी, बुंदीचे लाडू, शेव असे वाढीव पदार्थही दिसू लागले आहेत. चविष्ट जेवण, थंडीतला गारवा आणि त्यावर प्रभागातील अटीतटीच्या लढतीच्या चर्चा यामुळे वेळ अमावस्येच्या उत्साहात राजकारणाची खमंग फोडणी पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. सणाच्या निमित्ताने सुरु झालेल्या या भेटीगाठी पुढील काही दिवसांत मतपेटीपर्यंत कशा पोहोचतात, याकडे साऱ्या लातूरचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या: