लातूरमधील तरुणीच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 17 Oct 2018 07:39 AM (IST)
हत्या झालेल्या अपूर्वा यादवविरोधात यापूर्वी एका मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता.
लातूर : लातूरमधील 19 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी नवी माहिती समोर येत आहे. मयत अपूर्वा यादवविरोधात यापूर्वी एका मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे अपूर्वाच्या हत्या प्रकरणाचं गूढ आणखीनच गडद झालं आहे. राहत्या घरी चाकूने भोसकून अपूर्वाची हत्या करण्यात आली होती. हत्या झाली त्यावेळी अपूर्वा घरात एकटीच होती. अपूर्वाची आई देवदर्शनासाठी गेली होती, तर मेडिकलचं दुकान असल्यामुळे वडीलही कामानिमित्त बाहेरगावी होते. अपूर्वाची आई घरी परतली, तेव्हा तिने अपूर्वाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. त्यानंतर तिला तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अपूर्वा कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वीच ती लातुरात आपल्या घरी आली होती. हत्येचं कारण आणि मारेकऱ्यांविषयीची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिसांची दोन पथकं सध्या या गुन्ह्याच्या तपासासाठी तयार करण्यात आली आहेत.