आगीत होरपळून लातूरमध्ये मायलेकाचा झोपेतच मृत्यू
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 21 Nov 2016 12:07 PM (IST)
लातूर : शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मायलेकाचा झोपेतच होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हाळी उमरगामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. या आगीत शुभांगी बिराजदार या 28 वर्षीय महिलेचा आणि तिच्या तीन वर्षाच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. घराचं बांधकाम सुरु असल्यामुळे सर्व साहित्य एकाच खोलीत ठेवण्यात आलं होतं. सकाळी साडेतीन वाजता महिलेचा पती नवीन बांधकामावर पाणी मारण्यासाठी उठले असता त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी विद्युतप्रवाह बंद करुन आग विझवली मात्र तोपर्यंत त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला होता. निलंगा पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.