Latur News: चार दिवसापासून लातूरच्या सोनखेड ग्रामस्थांना परेशान करणाऱ्या वानरास अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. मागील चार दिवसापासून 50 लोकांना चावा घेणारा या वानरास वन विभागाच्या औरंगाबाद आणि लातूर येथील पथकाने जेरबंद केलं आहे. मागच्या चार दिवसांपासून  एक वानर विरुद्ध हजाराच्या वर नागरिक असा संघर्ष रंगला होता.  अडीच हजार लोकसंख्येचे सोनखेड हे गाव मागील चार दिवसापासून या वानराच्या दहशतीने अक्षरशः हादरले होते. गावातील 50 पेक्षा जास्त लोकांना या वानरांना चावा घेतला होता.


वानराच्या दहशतीमुळे गावातील शाळा बंद 
वानराच्या दहशतीमुळे गावातील शाळा बंद केली होती, तसेच किराणा दुकानही बंद केली होती. काठी घेतल्याशिवाय गावातील अबालवृद्धांना, महिलांना बाहेर पडणे कठिण झालं होतं. गावातील व्यवहार बंद झाले होते, तसेच शेतात जाणंही मुश्किल झालं होते.  वानराच्या दहशतीमुळे अघोषित लॉकडाऊन गावात लागला होते. याची माहिती लातूर वन विभागाला कळाली. लातूर वन विभागाची 30 लोकांची टीम गावात दाखल झाली.


ड्रोन कॅमेरा, जाळे, पिंजरे असे अद्यावत यंत्रणा घेऊन वन विभाग गावात दाखल झालं. या वानराने चारेक कर्मचाऱ्यांनाही चावा घेतला होता. वनविभागानं त्यानंतर औरंगाबादच्या पथकाला पाचारण केलं. औरंगाबाद आणि लातूर वन विभागाच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईस आज सकाळी यश आलं. अतिशय बिथरलेल्या अवस्थेत असलेल्या या वानराला शेवटी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. 


चार दिवसापासून या वानराने सोनखेड ग्रामस्थांना अक्षरश: सळो की पळो करून सोडलं होतं. महाराष्ट्र कर्नाटक या सीमारेषेवर असलेलं महाराष्ट्रातील हे गाव वानराच्या टोळीला सरावलेले आहे. या भागातील बोरसुरी,माने जवळगा ,सोनखेड यासारख्या गावांमध्ये वानराच्या अनेक टोळ्या आहेत. आज पर्यंत या टोळ्यांनी गावामध्ये, शेतामध्ये थोडंफार नुकसान केलं आहे..मात्र मानवी वस्तीत लोकांवर हल्ले केले नव्हते. मागील चार दिवसापासून या वानराने लोकांवर जबरदस्त हल्ले करायला सुरुवात केली.  


जखमी लोकांना वन विभागाकडून आर्थिक मदत  
वानराच्या या अचानक बदललेल्या वागणुकीमुळे चार दिवसापासून हैरान झालेल्या ग्रामस्थांना शेवटी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. वनविभाग या वानरावर योग्य ते औषध उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यास पुढील कारवाई करत आहे. जखमी लोकांना वन विभागाकडून आर्थिक मदत  देण्यात येणार आहे. 


ही बातमी देखील वाचा


Latur: एका वानरानं अख्खं गाव जेरीस आणलं; लातूरमधील या गावात प्रत्येकाच्या हातात काठी! नेमकं काय घडलंय