लातूर जिल्ह्यातील साकोळमध्ये शैलजा परमेश्वर उमाटे या 27 वर्षीय विवाहितेचा मृतदेह राहत्या घरातच आढळून आला. त्यानंतर सासरचे सर्व जण मृतदेह तसाच टाकून फरार झाले होते. अखेर पतीसह सासू-सासरे यांना पोलिसांनी उदगीरमधून ताब्यात घेतलं आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
शैलजाचा विवाह एक वर्षांपूर्वी खासगी शिकवणी घेणाऱ्या परमेश्वर उमाटे यांच्याबरोबर झाला होता. साडेचार लाख रुपये हुंडा आणि मानपान केल्यानंतरही सासरच्या लोकांची पैशाची हाव कमी होत नसल्याचा आरोप केला जात आहे. सतत पैशांची मागणी करुन तिला त्रास दिला जात असल्याचं माहेरच्यांनी म्हटलं आहे.
काही महिन्यांपूर्वी तिचा गर्भपातही झाला होता. त्यात तिला मुलगी झाली, यामुळेही तिचा छळ केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.
शैलजाच्या मृत्यूच्या आदल्या रात्री अचानक तिच्या माहेरी फोन आला की तिने घरात स्वतःला कोंडून घेतलं आहे. माहेरची मंडळी सासरी आली, त्यावेळी घरात कोणीच नव्हतं. मात्र शैलजा मृतावस्थेत दिसून आली.
शैलजाचा नवरा, दीर, त्याची पत्नी आणि सासू सासरे हे पळून गेले होते. शैलजाचा मृतदेह पोलिस स्टेशनच्या परिसरात ठेवून आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका शैलजाच्या नातेवाईकांनी घेतली होती. अखेर पतीसह सासू-सासरे यांना पोलिसांनी उदगीरमधून ताब्यात घेतलं.