लातूर : शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाइन काल दुपारी जोड जवळा गावाजवळ फुटली. लाखो लिटर पाणी यामुळे वाया तर गेलेच परंतू या परिसरातील जवळपास अकरा शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात पाणी शिरले. या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची भरपाई मिळेपर्यंत दुरुस्तीचे काम ग्रामस्थांनी थांबवले आहे.
पाईप लाइन फुटल्याने काल दोन तासांत लाखो लिटर पाणी वाया गेले. आजूबाजूच्या शेतात आणि घरात पाणी गेल्याने त्याठिकाणी असलेले सोयाबिन, ज्वारी, डाळ पाण्यात भिजले. पाण्यामुळे खत, बियाणे यांचे देखील नुकसान झाले आहे. तसेच पाण्याचा फोर्स प्रचंड असल्याने काही घरे पडली आहेत. या सर्वाची नुकसान भरपाई कोण करणार असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
आज सकाळी महानगरपालिकेने ही पाईप लाइन दुरुस्त करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना पाठवले होते. मात्र ग्रामस्थांनी दुरुस्तीचे हे काम थांबवले. या प्रकरणी आधी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, नुकसानभरपाई द्या मगच काम करा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांनी गावाला भेट देत नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आता लातूर महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत .
लातूरात पाईप लाईन दुरुस्तीचे काम ग्रामस्थांनी थांबवले, नुकसान भरपाईची मागणी
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
24 Dec 2018 01:48 PM (IST)
या प्रकरणी आधी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, नुकसानभरपाई द्या मगच काम करा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -