मुंबई : मंबई-पुणे महामार्गावर गेल्या दोन दिवसांपासून अपघातांची मालिका सुरुच आहे. आज सकाळी रसायनीजवळ भरधाव करोला कारने ट्रकला धडक दिली. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.


दरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी दिवसभरात तीन अपघात झाले होते. या तीन अपघातांमध्ये 3 प्रवाशांचा मृत्यू झाला. आज सकाळी महामार्गावर अजून एक अपघात होऊन अपघातांची मालिका सुरुच राहिली आहे.

आज सकाळी रसायनीनजीक मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर फास्ट लेनने जाणाऱ्या ट्रकला मागून भरधाव आलेल्या करोला कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील चालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून कार चक्काचूर झाली आहे.

ट्रक चालक चुकिच्या लेनमधून ट्रक चालवत होता. त्याच्या चुकिची शिक्षा कारमधील प्रवाशांना बसला आहे. कारमधील दोन तरुणांना प्राण गमवावे लागले आहेत.

या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर लेनची शिस्त न पळणाऱ्या अवजड वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करणे गरजेचे झाले आहे. तसेच वाहनचालकांनी वेग मर्यादा पाळणेदेखील आवश्यक आहे.