लातूर : वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात पुढाकार असलेलं विवेकानंद रुग्णालय अर्थात संशोधन केंद्राचे संस्थापक डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभूषण' जाहीर झाला आहे.

डॉ. अशोक कुकडे हे मूळचे पुण्यातील. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंयसेवक होते. त्यांना 1965 साली वैद्यकीय सेवा करण्यासाठी संघाकडून जाणीवपूर्वक लातूरमध्ये पाठवण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात गोल्ड मेडल मिळवलेल्या डॉ. कुकडे यांनी तो संघाचा आदेश मानत लातूर गाठलं.

सुरुवातीला डॉक्टरांनी लातूरमध्ये विवेकानंद रुग्णालयाची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही काम उभं केलं. त्यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद रुग्णालयाचा आता चांगलाच विस्तार झाला असून त्यांच्या पुढाकाराने लातूरमध्ये कॅन्सर रुग्णालयाचीही स्थापना झाली आहे.

जनकल्याण निवासी विद्यालय, संवेदना सेरेबल पाल्सी केंद्र अशा संस्थाही डॉ. कुकडे यांच्या प्रेरणेतूनच उभारण्यात आल्या आहेत. या संस्थांची गणना नावाजलेल्या संस्थांमध्ये होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवरील जबाबदारी होती. चार राज्याचा सहभाग असलेल्या संघाच्या पश्चिम विभागीय समितीचे ते प्रमुख होते.