लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सरशी होताना दिसत आहे.  पुन्हा बँकेची एक हाती सत्ता काँग्रेसकडेच असणार आहे. कारण भाजपाच्या सर्व उमेदवाराचे अर्ज निकषात नसल्यामुळे बाद झाले आहेत. यावर दोन्ही बाजूने आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आज भाजपाच्या वतीने बँकेच्या लातूर येथील मुख्य शाखेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच ते बँकेच्या मुख्य शाखेत दाखल झाले आहेत. 


लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक भाजपाच्या सर्व उमेदवाराच्या अर्ज हे बाद झाल्यामुळे चांगलीच गाजत आहे. 19 जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 70 उमेदवारांनी सहभाग घेतला होता. 117 अर्ज या वेळी दाखल करण्यात आले होते. अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली कारण अर्ज छाननीमध्ये भाजपाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज हे बाद ठरले. काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांचे अर्ज ही बाद ठरले होते. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पकड मजबूत होणार आहे हे दिसून येत आहे.


कसे झाले उमेदवारी अर्ज बाद?


बेबाकी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे काढताना विरोधी उमेदवारांना अनंत अडचणी आल्या
छाननीच्या दिवशीच बाकी भरल्याने भाजपच्या अनेक उमेदवारांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवला. सहकार बोर्डाची थकबाकी असल्यास ही उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. 


भाजपाची लढण्यापूर्वीच हार ...घेतला आक्रमक पवित्रा


भाजपाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेत यावेळी मोर्चेबांधणी केली होती. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात आमदार रमेश कराड यावर बारीक लक्ष ठेवून होते. मात्र अर्ज सादर केल्यानंतर झालेल्या छाननीमध्ये भाजपाच्या सर्व उमेदवाराचे अर्ज बाद ठरले आहेत. यामुळे भाजपाच्या गोटात प्रचंड नाराजी आहे. सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा खून केला आहे. याची तक्रार आम्ही राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे करणार आहोत. तसेच केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असून यात अर्ज बाद करणारे सरकारी यंत्रणेच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागणार असल्याची माहिती रमेश कराड यांनी दिली आहे. 


चौघे बिनविरोध दोन आमदाराचा समावेश 


अर्जाच्या  छाननीनंतर लातूर ग्रामीण चे काँग्रेस पक्षाचे आमदार धिरज देशमुख हे मार्केटिंग सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. अहमदपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था  मतदारसंघातून अहमदपूरचे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार बाबासाहेब पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. चाकूर विविध  सेवा सहकारी संस्था  मतदारसंघातून नागनाथ पाटील तर जळकोट  विविध  सेवा सहकारी संस्था  मतदारसंघातून मारोती पांडे हे बिनविरोध निवडून आले आहेत.


ठिय्या आंदोलन


भाजपाने अर्ज बाद झाल्यावर दोन दिवस आरोपाची राळ उडवली होती. मात्र आज भाजपाने अचानक आक्रमक पावित्रा घेतला आहे. अर्ज कसे बाद होतात ? याचा जाब विचारण्यासाठी भाजपाचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष रमेश कराड आणि अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात अनेक भाजपाचे उमेदवार यांनी बँकेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे, याची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी बँकेकडे धाव घेतली आहे.


लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 


1982 ला लातूर जिल्ह्याची निर्मित झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातून बँकेचे हि विभाजन झाले. पुढील काही वर्ष बोर्डा ने बँकेचे कामकाज पाहिले. 1987 साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात बँकेच्या 19 जागेवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळाली. अध्यक्ष झाले विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव  देशमुख.. बँकेच्या आर्थिक डबघाईला आलेल्या स्थितीमुळे सेक्शन 11 लागला होता. बँकेवर भाजपाचे लक्ष आहे मात्र त्याच्या हातात अद्याप पर्यंत यश काही आलेच नाही.  यावेळी चांगलाच जोर लावण्याच्या विचारात  असलेली भाजपाच्या सर्व उमेदवाराचे अर्ज बाद ठरल्यामुळे बँकेच्या राजकारणात आरोपप्रत्यारोप फैरी झडत आहेत