लातूर : पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि भाजप नेते पाशा पटेल यांची मुजोरी कायम असल्याचं पाहायला मिळालं. पटेल यांनी माफी मागण्यास नकार दिला असून, उलट माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेल्याचा कांगावा केला आहे.

'पत्रकार परिषद सुरु व्हायच्या अर्धा तास आधी हा प्रकार घडला. 21-22 वर्षाचा तरुण मुलगा होता. सर्व जण उठून उभे राहिले, मात्र तो बसून होता. मी आल्या-आल्याच माझ्याशी अपमानास्पद भाषेत बोलू लागला. त्याचे हावभाव, त्याची आक्रमकता पाहून मला राग अनावर झाला आणि माझ्या तोंडून शिवी निघाली' असा दावा पाशा पटेल यांनी केला आहे.

मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे. किमान माझ्या वयाचा तरी आदर राख, असं मी त्याला समजवत होतो. तरी तो आवरला नाही, असा दावा पटेल यांनी केला.

पत्रकाराला शिवीगाळ, भाजपच्या पाशा पटेलांवर गुन्हा दाखल


'तो पत्रकार आहे हे मला माहित नव्हतं. मुळात त्यावेळी अधिकृत पत्रकार परिषद सुरु नव्हती. त्याच्याकडे पत्रकार असल्याचं कोणतंही ओळखपत्र किंवा पुरावा नव्हता, बूम, कॅमेरा यासारखी सामग्री नव्हती, ती प्रेसची वेळ नव्हती. तो संघटनेच्या कार्यकर्त्यांचा समूह होता' असं पाशा पटेल म्हणाले.

पेट्रोल दरवाढीवर प्रश्न, पत्रकाराला पाशा पटेलांची शिवीगाळ


पेट्रोलविषयी कुठलाच प्रश्न विचारला नसल्याचा दावाही पटेल यांनी केला आहे. 'तुम्ही शेतकऱ्याची वाट लावली का, असा प्रश्न त्याने विचारला. छुप्या कॅमेराने हा प्रकार शूट करत ते पत्रकार परिषदेत घडल्याचा बनाव केला. मी रिअॅक्ट व्हावं असं षडयंत्र रचणं कितपत बरोबर आहे' असा प्रश्न विचारत त्यांनी कथित कटाचा निषेध केला.

पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार विष्णू बुरगे यांनी केलेल्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधाच रविवारी पहाटे एफआयआर दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

पेट्रोल दरवाढीवर पत्रकारानं प्रश्न विचारल्यानंतर संताप अनावर झालेल्या पाशा पटेल यांनी पत्रकाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. लातूर विश्रामगृहात हा सगळा प्रकार घडला.

ही घटना घडली त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांच्यासह पत्रकार आणि काही शेतकरीही उपस्थित होते.

‘पेट्रोलची भाववाढ झाली, शहरात येण्यासाठीही शेतकरी आता विचार करेल, सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली का?’ असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर पाशा पटेल भडकले आणि शिवीगाळ केल्याचा दावा पत्रकाराने केला आहे. मला बसून प्रश्न वाचरतो का औकात आहे का, असं बोलत पाशा पटेल यांनी प्रचंड शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झाला आहे.