Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि कुटुंबाचा फार मोठा इतिहास सांगितला जातो. लतादीदींच्या दैदिप्यमान अशा कारकीर्दीच्या इतिहासात खानदेशाचा देखील वाटा असून त्यांचे आजोळ असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर या गावाला त्यांच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात खानदेशाला विशेष महत्त्व आहे. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा खानदेशाच्या मातीत आजही अनेक ठिकाणी पहायला मिळतात. इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या धुळे जिल्ह्यातील थाळनेर (ता. शिरपूर ) हे गाव मंगेशकर कुटुंबीयांशी नाळ जोडणारे आहे. थाळनेरला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा मोठा वारसा लाभला असून खानदेशच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी थाळनेर गावाचा इतिहास लिहिला जावा इतके समृद्ध हे गाव आहे. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनानंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर हे गाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले.
थाळनेरच्या इतिहासाच्या पानांवर लतादीदी यांच्या आईच्या माहेरच्या आठवणी आहेत. ज्या कोकीळ कंठानं संपूर्ण जगाला मोहिनी घातली त्या लतादीदींच्या जडणघडणीत खानदेशच्या मातीचाही वाटा आहे, याची जाणीव खानदेशी माणसाच्या प्रत्येक मनाला आहे. तापी काठच्या मऊसूत मातीतला मऊपणा लतादीदींच्या कंठात उतरल्यानेच त्यांचे गाणे इतके रसाळ झाले, अशी भावना खानदेशी माणसाच्या मनात आहे.
तापी नदीच्या काठावरील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या थालेश्वर महादेवाच्या मंदिरावरून बारापाड्यांच्या गावाला थाळनेर असे नाव पडले. तेथे किल्ल्याची पडकी भिंत आणि तापीच्या काठावर असलेल्या बुरुजाचे अवशेष आढळतात. बराणपूरच्या सरदार घराण्याच्या समाध्या असलेल्या देखण्या 7 हजिऱ्या येथे आहेत. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबरचा. त्यांचा जन्म इंदोर येथे झाला असला तरी त्यांचे बालपण काही काळ थाळनेर येथे गेले असल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्रात त्या काळी असणाऱ्या विविध नाटक कंपन्यांपैकी दीनानाथ मंगेशकर यांची देखील एक नाटक कंपनी सुप्रसिद्ध होती. आपली नाटक कंपनी घेऊन दीनानाथ मंगेशकर खानदेशात यायचे. धुळे शहरात तर त्यांचा नियमित प्रवास असायचा. यातील काही दिवस ते थाळनेर येथे यायचे. थाळनेर येथे आल्यानंतर दिनानाथ मंगेशकर यांचा मुक्काम हरिदास शेठ यांच्याकडे असायचा. हरिदास शेठ यांची कन्या माई हिचा विवाह दिनानाथ मंगेशकर यांच्याशी लावून देण्यात आला. याच लता मंगेशकर यांच्या मातोश्री माई मंगेशकर.
मंगेशकर कुटुंबीयांच्या कोणत्याही आठवणी सध्या थाळनेर येथे बघावयास मिळत नसल्या तरी लतादीदींच्या बोलण्यातून थाळनेरचा उल्लेख नेहमीच ऐकायला मिळायचा. 1993 साली हृदयनाथ मंगेशकर यांनी शेवटची थाळनेर येथे भेट दिल्याचे सांगण्यात येते. लतादीदींचा फारसा सहवास थाळनेरकर नागरिकांना लाभलेला नसला तरी त्यांच्या आठवणींनी मात्र येथील माती पावन झाली आहे हे मात्र निश्चित.
महत्वाच्या बातम्या