पंढरपूर : भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कल्याण काळे यांनी आयोजित कार्यक्रमाला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर झालेल्या तुफान गर्दीमुळे कोरोना नियमांचे तीन तेरा वाजल्याचे विदारक चित्र आज पंढरपूर मध्ये पाहायला मिळाले. एका बाजूला पोटासाठी धडपड करणाऱ्या गोरगरीब टपरीवाल्यांना  पोलीस आणि प्रशासनाकडून कोरोनाचे नियम दाखवत त्रास दिला जात आहे. दुसरीकडे नेत्यांच्या सभेत मात्र सर्व नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून पाहत राहत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. 


 मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीच्या निमित्ताने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपुर आले होते. पहिल्या सभेत गर्दी झाल्यानंतर राज्यभर टीका सुरू होताच अजित पवार यांनी नंतर माध्यमांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. पण लगेच यानंतर गादेगव येथे झालेल्या सभेत पुन्हा अशीच गर्दी झाल्याने दादांची दिलगिरी  केवळ माध्यमांसमोर केलेले नाटक ठरली.


 गेले काही महिने तोंडावर नियंत्रण ठेवून बोलणारे अजित पवार आज बोलण्याच्या नादात आक्षेपार्ह वक्तव्य केले.  भाजपचे कल्याण काळे राष्ट्रवादीत येणार हे समजताच चार दिवसांपासून कल्याण काळे यांच्या मत परिवर्तनासाठी  काही भाजप नेते सातत्याने काळे यांची भेट घेऊ लागले होते . यावर बोलताना इतक्या दिवसात कल्याणची चौकशीही न करणाऱ्या भाजपवाल्यांच्या पोटात आता दुखू लागले असे म्हणत आक्षेपार्ह वाक्य अजित पवार यांनी वापरले.
 
यावेळी भाषण करताना अजित पवारांना 'मास्क काढा' असं लिहिलेली चिठ्ठी आली. त्यावर अजितदादांनी “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा” असं म्हणत त्या कार्यकर्त्यांमध्ये  एकचं हशा पिकला.


स्वतःचं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस - अजित पवार


परदेशात लस पाठवण्याच्या आधी आपल्या देशात लस द्या. स्वतःचं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस दिले जाते. आपल्याकडे यंत्रणा आहे. सीरमवर केंद्राचं कंट्रोल आहे, नाहीतर आम्ही सीरमला लस द्यायला सांगितलं असतं. मात्र राजकारण केले जाते. 'लोकांना लॉकडाऊन नको आहे. शेवटी माणसंही जगली पाहिजेत. 18 वर्षांच्या पुढील लोकांना लस द्या', असंही अजित पवार म्हणाले.