कल्याण : ठाणे-पुणे मार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. त्यामुळे काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.


माळशेज घाटातल्या बोगद्याजवळ रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरड कोसळल्याने आयशर टेम्पो पूर्णपणे ढिगाऱ्याखाली अडकला. यामध्ये टेम्पोचालक अमोल दहिफळे गंभीर जखमी झाला.



आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून चक्काचूर झालेला टेम्पो बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एका एसटी बसवर दगडही पडले, मात्र सुदैवाने एसटीतील प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

दरड कोसळल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर दगड आणि माती पडली आहे. प्रचंड धुकं आणि पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत असल्याची माहिती टोकावडे पोलिसांनी दिली आहे.

महामार्ग विभाग कर्मचारी, महसूल कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरड हटवण्याचं काम सुरु असून लवकरात लवकर मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न आहेत.