नागपूर : भूमाफियांनी घरावर दगडफेक केल्याची तक्रार करायला गेलेल्या दाम्पत्याला पोलिसांचा विचित्र अनुभव आला आहे. फक्त दगडफेक झाली, तुमची हत्याही तर झाली नाही ना? असा सवाल पोलिसांनी केल्याचा आरोप तक्रारदार अमिता जयस्वाल यांनी केला आहे.
नागपुरात भूमाफियांमुळे गोरगरिबांचं जगणं मुश्किल झाल्याचं चित्र आहे. 75 वर्षीय रामकिशोर आणि 65 वर्षीय जयश्री जयस्वाल या दाम्पत्याची झोपडी हडपण्यासाठी भूमाफिया धमकी देत आहेत. रात्रीच्या वेळी त्यांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली.
या दगडफेकीला कंटाळून दाम्पत्याच्या मुलांनी म्हणजे अमित आणि अमिता जयस्वाल या बहिण भावांनी सक्करदरा पोलीस स्टेशन गाठलं. मात्र पोलिसांनी अदखलपात्र नोंद करत त्यांना घरी पाठवलं.
तरीही त्रास कमी होत नसल्यानं त्यांनी गडकरी वाड्यावरही कैफियत मांडली. त्यानंतर पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलिसांनी तक्रार घेणं तर दूरच, 'फक्त दगडफेक झाली आहे, तुमचे हात पाय तुटले नाहीत आणि तुमची हत्याही झाली नाही ना?, असा सवाल पोलिसांनी केल्याचा आरोप अमिता जयस्वाल यांनी केला आहे.