मुंबई : बिल्डरने वेळेत घरं न दिल्याने, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि आम्रपाली ग्रुपचा रद्द झालेल्या कराराचं प्रकरण ताजं आहे. त्यातच आता दुसऱ्या एका कंपनीसोबतच्या वादात, आता मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव आलं आहे.   सचिन ज्या कंपनीचा ब्रँड अम्बेसेडर होता, त्या  'अमित एण्टरप्रायझेस'ने सुमारे दोन कोटीची जमीन अवघ्या 20 लाखात हडपल्याचा आरोप संदीप कुऱ्हाडे यांनी केला आहे. त्यामुळे आता सचिनने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संदीप यांनी केली आहे. या मागणीसाठी सचिनच्या मुंबईतील घरासमोर 18 मेपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.   काय आहे प्रकरण? पाटे कुटुंबीयांच्या 'अमित एण्टरप्रायझेस' या कंपनीने चार वर्षांपूर्वी संदीप कुऱ्हाडे यांच्या मामासोबत जमिनीचा व्यवहार केला होता.  पुणे जिल्हातील आंबेगाव इथंली ही जमीन संदीप कुऱ्हाडे यांच्या आजोबांच्या नावे होती. त्यामुळे वारसा हक्काने संदीप यांच्या मामासोबत आईचं नावही या जमिनीवर होतं. "या जमिनीच्या मोबदल्यात 'अमित एण्टरप्रायझेस'ने संदीपचे मामा शिवाजी पिंजन यांना केवळ 20 लाख रुपये दिले. मात्र या जमिनीची किंमत 2 कोटी आहे", असा दावा संदीप यांचा आहे.   सचिन या कंपनीचा 2010 ते 2014 या काळात ब्रँड अम्बेसेडर होता. त्यामुळं आता क्रिकेटचा देवच आम्हाला न्याय देऊ शकेल अशी आशा संदीप कुऱ्हाडे यांना आहे.   क्रिकेटचा देवच देईल न्याय   कुऱ्हाडे यांनी नुकतंच पश्चिम मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी सचिनच्या वांद्रे येथील घरासमोर 18 मे रोजी आमरण उपोषण करणार असल्याचं म्हटलं आहे. सचिनच मला न्याय देऊ शकेल असा विश्वास आहे, असं कुऱ्हाडे यांनी पत्रात म्हटलं आहे.   सचिन अत्यंत नम्र आणि मदत करणारा व्यक्ती आहे. सचिनने भ्रष्टाचाराविरुद्धदेखील लढा दिलेला आहे. त्यामुळं सचिनच्या घरासमोर लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण करत आहे. मदत मिळो ना मिळो मी सचिनचा नेहमी चाहता राहिल, असं कुऱ्हाडे यांनी पत्रात म्हटलं आहे.   'अमित एण्टरप्रायझेस'चा दावा  "अमित एण्टरप्रायझेस'ने संदीप कुऱ्हाडे यांचा दावा फेटाळून लावला आहे. कुऱ्हाडे यांची आई रंजना यांनी त्यांचे अधिकार संदीपचे मामा शिवाजी पिंजन यांकडे सुपुर्द केले होते. या व्यवहारावेळी संदीपचे वडिलही उपस्थित होते. वडिलोपार्जित जमिनीचा व्यवहार असल्याने आम्ही आणखी दक्षता घेत, नोंदणी कार्यलायतून आम्ही त्यांच्या अधिकारासंबंधात प्रत मिळवली.त्यानंतर आम्ही दीड कोटी रुपयात ही जमीन खरेदी केली. त्यानंतर शिवाजी यांच्या विनंतीवरुन 20 लाख रुपये त्यांच्या बहिणीला म्हणजे रंजना यांना देण्यात आली", असं 'अमित एण्टरप्रायझेस'चे कायदे सल्लागार अमित दुवेकर यांनी सांगितलं.   याशिवाय पैसे उकळण्याच्या आणि कंपनीला बदनाम करण्याच्या हेतून, संदीप यांनी कंपनीवर आरोप केल्याचा दावा, 'अमित एण्टरप्रायझेस'चे रोहन पाटे यांनी केला आहे. तसंच जेव्हा संदीपच्या आईला 20 लाख रुपये मिळाले तेव्हा म्हणजेच 4 वर्षांपूर्वीच त्यांनी ही तक्रार का केली नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.   सचिनला मध्ये खेचून प्रसिद्धिचा प्रयत्न दुसरीकडे सचिन तेंडुलकर सध्या 'अमित एण्टरप्रायझेस' ब्रॅण्ड अम्बेसेडर नाही. तो 2010 -2014 या दरम्यानच तो कंपनीचा ब्रॅण्ड अम्बेसेडर होता. त्यामुळे त्याचं नाव घेऊन असे आरोप करणं चुकीचं असल्याचं रोहन पाटे यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

धोनी आम्हाला घर मिळवून दे, 'आम्रपाली'च्या ग्राहकांचा तगादा

धोनी आणि आम्रपाली ग्रुपचं ब्रेकअप !

धोनीसोबत जे झालं ते अत्यंत दुर्दैवी : अनिल कपूर