नवी दिल्ली : नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमामुळे राज्यासह देशात सध्या आंतरजातीय विवाहाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मात्र आजही आंतरजातीय विवाहांना स्वीकारलं जात नाही, हे वास्तव आहे. परंतु भारतात असं एक राज्य आहे जे आंतरजातीय विवाहांमध्ये अव्वल आहे.

 

भारतात सर्वाधिक आंतरजातीय विवाह मिझोराममध्ये होतात. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

 

भारतात केवळ 5 %  आंतरजातीय विवाह



मिझोराममध्ये 55 टक्के लग्न आंतरजातीय होतात. एनसीएईआरच्या अहवालानुसार, भारतात 95 टक्के विवाह एकाच जातीत होतात.

 

पण मिझोराम याला अपवाद आहे. मिझोरामची 87 टक्के लोकसंख्या ख्रिश्चन धर्मिय आहे.

 

आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत 46 टक्क्यांसह मेघालय दुसऱ्या आणि 38 टक्क्यांसह सिक्कीम तिसऱ्या स्थानावर आहे.

 

इंडियन ह्यूमन डेव्हलपमेंट सर्व्हेनुसार, आंतरजातीय विवाहाच्या बाबातीत जम्मू-काश्मीर चौथ्या आणि गुजरात पाचव्या स्थानावर आहे.

 

या सर्वेक्षणात भारतातील 33 राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 41,554 कुटुंबाचा समावेश करण्यात आला होता.

प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर कुऱ्हाडीने हल्ला


 

मध्य प्रदेशात सर्वाधिक स्वजातीय विवाह



भारतात एकाच जातीत सर्वाधिक लग्न मध्य प्रदेशात होतात, हेदेखील या सर्व्हेतून समोर आलं आहे. मध्य प्रदेशात 99 टक्के लोक त्यांच्याच जातीत लग्न करतात.

 

याशिवाय हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 98 टक्के विवाह एकाच जातीत होता.

 

भारतात आंतरजातीय विवाहाला मान्यता आहे. देशात या संबंधित कायदा 50 वर्षांपेक्षा जास्त काळापासून लागू आहे.

 

परंतु जातीबाहेर लग्न करणाऱ्यांना त्यांच्याच कुटुंबाचा किंवा समाजाचा विरोध तसंच हिंसेचा सामना करावा लागतो.

 

तरीही समाजात हळूहळू बदल होत आहे, ही काहीशी दिलासादायक बाब आहे. आमच्या समाजातील अशा लोकांना ओळखतो, ज्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे, असं सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 27 टक्के लोकांनी मान्य केलं आहे. शहरांमध्ये हा आकडा 36 टक्क्यांपर्यंत पोहोचतो.