पुणे : पुण्यातील भाजपच्या नगरसेविकेने ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री दोन वाजता ही घटना घडली आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयातील महिला डॉक्टर स्नेहल खंडागळे यांच्या तक्रारीवरुन भाजपाच्या नगरसेविका आरती कोंढरे यांच्याविरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ससून रुग्णालयात मंगळवारी रात्री डॉक्टर स्नेहल खंडागळे या वार्ड क्र. 43 मध्ये रुग्णावर उपचार करत होत्या. त्यावेळी नगरसेविका कोंढरे यांनी तेथे येऊन त्यांच्या मुलावर आणि त्याच्या मित्रावर उपचार करण्यास सांगितलं.


यावर खंडागळे यांनी रुग्णाच्या डोक्यात टाके घेतले असून त्याला सीटी स्कॅनसाठी पाठवायचे आहे, असं सांगत थांबायला सांगितलं. मात्र नगरसेविका कोंढरे यांनी वाद घालायला सुरुवात केली. तुझी वरिष्ठांकडे तक्रार करते, अशी धमकी देत मोबाईल कॅमेराद्वारे शुटिंग करण्यास सुरुवात केली.

डॉ. स्नेहल खंडागळे यांनी कोंढरे यांना शुटिंग करु नका, असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नगरसेविका कोंढरे यांनी खंडागळे यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत तुला बघून घेईन अशी धमकी दिली, असं खंडागळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

आरती कोंढरे पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 18 'ब' महात्मा फुले पेठ या प्रभागातून भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या आहेत.

डॉक्टरांनी सहकार्य न करता गैरवर्तन केलं : आरती कोंढरे

माझ्या मुलाचा आणि त्याच्या मित्राचा अपघात झाला होता. त्यासाठी मी ससून रुग्णालयात गेले होते. मात्र तेथील डाॅक्टरांनी कुठलंही सहकार्य केलं नाही. गैरवर्तणूक केली. माझा मोबाईल हिसकावून घेत मला ढकलून दिले. त्यामुळे माझ्याकडूनही तशीच प्रतिक्रिया आली. संबंधित डाॅक्टरांविरोधात ससून रुग्णालयाचे डीन आणि पोलिसांकडे तक्रार करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नगरसेविका आरती कोढंरे यांनी दिली आहे.