रायगड : देशभरात आज 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. महायुती (Mahayuti) सरकारमधील पालकमंत्र्यांनीही आपल्या जिल्ह्यात जाऊन आज ध्वजारोहन केले. मात्र, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन सध्या महायुतीत वाद असतानाही महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहन केले. प्रजासत्ताक दिन हा दिवस सगळ्यांसाठी सुवर्णक्षण असतो,  कोणालाही या दिवशी बहुमान मिळणे हा भाग्याचा दिवस आहे. देशाच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणे हे लोकप्रतिनिधींसाठी भाग्याचा दिवस असून तो बहुमान मला मिळाल्याचे सांगत आदिती तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहनाचा सन्मान मिळाला त्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद व लाडकी बहीण योजनेतील (ladki bahin yojana) स्क्रुटीनीबद्दलही त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. राज्यातील लाडक्या बहि‍णींना जानेवारी महिन्यातील पैसे मिळण्यास कालपासूनच सुरुवात झाली आहे. त्यासंदर्भाने बोलताना या योजनेतील निकषांत एकही बदल करण्यात आला नसल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले. 


राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा, अफवा आणि चुकीच्या बातम्याही प्रसारीत होत आहेत. सरकारकडून या योजनेतील निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच, सरकारकडून योजनेतील महिलांची नावे कमी करण्यात येत आहेत, लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेतले जाणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, यावर महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एकही निकष आम्ही बदललेला नाही. सद्यस्थितीत राज्यातील 2 कोटी 41 लाख महिलांना या योजनेचा लाभ आतापर्यंत मिळालेला आहे. शासन निर्णयाला धरुनच ही योजना सुरू आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तसेच, अनेक महिला या दिलेल्या निकषमध्ये बसत नसल्याने स्वतःहून यांबाबत आपली भूमिका मांडत आहेत, अनेक महिलांनी निकषात न बसल्याने स्वतःहून रक्कम जमा केली आहे. त्यामुळे, राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक शासकीय योजनेत आम्ही पुन्हा पडताळणी करत आहोत, असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. 


पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील


रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील.  त्यानंतर योग्य उमेदवारला ती जबाबदारी मिळेल, असे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले. आदिती तटकरे यांनी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री म्हणून ध्वजारोहन केले. मात्र, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तू तू मै मै असल्याने मुख्यमंत्र्‍यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावरील नियुक्त्यांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. 


दावोसमध्ये 15 लाख कोटींचे करार


मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये केलेले 15 लाख कोटींचे करार आपल्या राज्यासाठी अभिमानच असेल. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात अधिक सामांज्यासाचे करार दावोसमध्ये केले आहेत, असे आदिती तटकरे यांनी म्हटलं. 


हेही वाचा


गुलेन बॅरी सिंड्रोमचे महागडे उपचार; खासगी रूग्णालयांकडून लूट, पुणे महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय