पुणे: पुणे महापालिकेकडून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवू शकत नसल्याने गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)  हा आजार झपाट्याने वाढत आहे. याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे महापालिकेने या आजाराच्या रुग्णांना मोफत उपचार देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुणे शहरातील ज्या भागात जास्त प्रमाणात रूग्ण आढळले त्या भागातील नागरिकांशी चर्चा केली होती. त्यावेळी त्या नागरिकांनी देखील या आजारावरील उपचारांसाठी मोठा खर्च होत असल्याने मोफत उपचार केले जावेत अशी मागणी केली होती, ती मागणी मान्य झाली असल्याची माहिती आज अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर याबाबतची सविस्तर माहिती पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. 

कमला नेहरू रुग्णालयात बेड आयसीयू आरक्षित

गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) बाबत माहिती देताना  पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले म्हणाले, गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) आजरावर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) चे पुण्यात 74 रुग्ण आहेत. त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर पाच रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे.  कमला नेहरू रुग्णालयात 50 बेड तर 15 आयसीयू या आजाराच्या रूग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत, अशी माहिती देखील राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. 

खाजगी दवाखाने रुग्णांची बिल किती घेतात यावर लक्ष 

पुणे महापालिका आयुक्त सर्व आरोग्य विभागाची आज बैठक घेणार आहेत. ज्या खाजगी रुग्णालयात  गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)चे रुग्ण आहेत.  (नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ रुग्णालय) त्या ठिकाणी महापालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत. या ठिकाणी खाजगी दवाखाने रुग्णांची बिल किती घेतात यावर ऑफिसर लक्ष ठेवणार आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. 

मोफत उपचाराबाबत अजित पवारांनी दिल्या सूचना

अजित पवारांनी आज पुण्यात ध्वजवंदन केलं, त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी गुलेन बॅरी सिंड्रोम आजारावरती मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. अजित पवार बोलताना म्हणाले, शहरात गुलेन बॅरी सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) रुग्णांची वाढ होते आहे. कमला नेहरू पार्कमध्ये रुग्णांना मोफत उपचार मिळत आहे, आर्थिक ताण मिळू नये म्हणून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. या आजाराचे नवीन संकट आपल्या आले आहे, पण घाबरून जाऊ नका. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांचं सर्वांचे त्यावर लक्ष आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.  

काय काळजी घ्यावी

पाणी उकळून व गाळून प्यावे.उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

जीबीएस कसा होतो?

दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.

कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणेअतिसारपोटदुखीतापमळमळ किंवा उलट्या