Dhule News : धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2025) ध्वजवंदन सोहळ्याप्रसंगी वावड्या पाटील नामक गोरक्षकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी (Police) गोरक्षकाला वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन सोहळा सुरू होता. यावेळी शिरपूर येथील गोरक्षक असलेल्या वावड्या पाटील नामक गोरक्षकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
वाहतूक पीआयवर गंभीर आरोप
शिरपूर शहरातून अवैधरित्या होणारी गोवंशाची वाहतूक पीआय के. के. पाटील हे थांबवत नसून आम्ही या गाड्या अडवण्यासाठी गेलो असता आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचा आरोप वावड्या पाटील यांनी केला आहे. के. के. पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वावड्या पाटील यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच गोरक्षकाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
जिल्हा परिषदेच्या आवारातही आत्मदहनाचा प्रयत्न
दरम्यान, धुळ्यात प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा दुसरा प्रकार घडला. धुळ्यातील जैताणे ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवकांनी आपला मनमानी कारभार चालवला आहे. दलित वस्तीत येणारा निधी हा आपल्या वार्डामध्ये वळवून सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेच्या आवारात एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. समाधान महाले असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. जैताणे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी समाधान महाले यांनी केली आहे. महाले हे आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना जिल्हा परिषद सीईओ यांच्या अंगरक्षकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी समाधान महाले यांना अडवून पोलिसांच्या ताब्यात दिली. यामुळे प्रजासत्ताक दिनी मोठा अनर्थ टळला.
जिल्ह्यात विकासाची गंगोत्री आणण्यासाठी तत्पर : जयकुमार रावल
दरम्यान, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्र शासनाचे पालकमंत्री या नात्याने अभिनंदन केले. जिल्ह्यात विकासाची गंगोत्री आणण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आपण तत्पर राहण्याच आश्वासन जयकुमार रावल यांनी यावेळी दिले.
आणखी वाचा