छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनानंतर सरकारने शिंदे समितीची नियुक्ती केली. त्यामुळे राज्यात तब्बल 57 लाख मराठा कुणबी नोंदी (Maratha Kunbi Records) आढळून आल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, आता कोणत्या विभागात किती नोंदी मिळाल्या याची देखील आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कुणबी नोंदी विदर्भात सापडल्या असून, अमरावती (Amravati) आणि नागपुरात (Nagpur) एकूण 35 लाख 57 हजार 435 नोंदी सापडल्या आहेत. 'लोकमत'ने ही आकडेवारी दिली आहे. 


राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख नोंदी सापडल्या असून, 38 लाख 97 हजार 391 प्रमाणपत्र वाटण्यात आली आहे. विशेष म्हणजे कमी नोंदी मराठवाड्यात सापडल्या आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत एकूण 32 हजार 91 नोंदी सापडल्या असून, 23 हजार 290 प्रमाणपत्र वाटण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात काही गावांमध्ये एकही नोंद सापडलेली नाही. दुसरीकडे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात मात्र मराठा कुणबी नोंदी सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. 


कुठे किती नोंदी सापडल्या...


कोकण : 7 लाख 53 हजार 56 नोंदी सापडल्या. 
पुणे : 6 लाख 7 हजार 619 नोंदी सापडल्या.
नाशिक : 7 लाख 91 हजार 40 नोंदी सापडल्या.
छत्रपती संभाजीनगर : 32 हजार 91 नोंदी सापडल्या.
अमरावती : 26 लाख 15 हजार 227 नोंदी सापडल्या.
नागपूर : 9 लाख 42 208 नोंदी सापडल्या.


मराठवाड्यात किती नोंदी सापडल्या? 


छत्रपती संभाजीनगर : 3 हजार 482
जालना : 2 हजार 802
परभणी : 2 हजार 477
हिंगोली : 316
धाराशिव : 3 हजार 309
लातूर : 310
बीड : 9 हजार 752
नांदेड :  1 हजार 728


नांदेड जिल्ह्यातील 600 लोकांना प्रमाणपत्र वाटप...


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मराठा समाजाला कुणबी नोंदीचा फायदा होतांना पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये सहाशे जणांना याचा लाभ झालाय. शासनाच्या सुधारित आदेशानंतर सहाशे जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात कुणबी जातीच्या 1 हजार 728 नोंदी सापडल्याचे देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितलय. सोबतच मागसवर्ग आयोगाच्या वतीने सुरु असलेलं सर्वेक्षण पुढील दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले. 


बीड जिल्ह्यात 68 टक्के सर्वेक्षण 


मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला वेग आला असून, उद्या या सर्वेक्षणाची अंतिम तारीख आहे. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 68 टक्के मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 23 जानेवारीपासून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. बीड जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीमुळे सर्वेक्षण करता आलं नव्हतं. मात्र, आता या सर्वेक्षणाला वेग आला असून, सर्वेक्षण करणारे कर्मचारी दारोदारी जाऊन खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करत आहेत. या सर्वेक्षणासाठी 182 प्रश्नाची प्रश्नावली असून, काही प्रश्न किचकट असल्याचे सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी चक्क खाजगी व्यक्तींची नियुक्ती; ऑडिओ क्लिप व्हायरल