चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारा येथून बंदिस्त करून नागपुरात गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आलेल्या केटी - 1 या वाघाचा आज सकाळी अचानक मृत्यू झाला आहे. केटी - 1 या दोन वर्षीय वाघाने अवघ्या काही दिवसातच चंद्रपूर जिल्ह्यात एकानंतर एक पाच ग्रामीणांना जीवे मारल्यानंतर नरभक्षक झालेल्या वाघाला पकडण्यात यावे अशी मागणी जोर धरु लागली होती. वन विभागाने केटी - 1 ला बंदिस्त करण्यात यावे असे आदेश काढले होते. त्यानंतर 10 जून रोजी केटी - 1 वाघाला बेशुद्ध करुन बंदिस्त करण्यात आले होते. 11 जूनला केटी - 1 या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा येथील वन विभागाच्या रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आले होते. तेव्हापासून गेले 11 दिवस केटी - 1 वाघ नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मधील त्याच्या पिंजऱ्यातच होता.


दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार केटी - 1 वाघाला जेव्हा पासून गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आले होते. तेव्हा पासूनच त्याची भूक कमी झाल्याचे दिसून येत होते. तो कमी प्रमाणात खात होता. साधारणपणे जंगलातील वाघाला जेव्हा ही पिंजऱ्यात बंदिस्त केले जाते, तेव्हा सुरुवातीच्या काही दिवसात त्या वाघाचे खाणे कमी होते असा सर्वसाधारण अनुभव असतो. केटी- 1 च्या बाबतीत ही तसेच झाले होते, मात्र, तरीही त्याच्या सर्व शारीरिक हालचाली पहिल्या सारख्याच होत्या अशी माहिती गोरेवाडा रेस्क्यू सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिली.


आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास केटी - 1 वाघ त्यांच्या पिंजऱ्यात सुस्त अवस्थेत आढळला होता. त्याच्यावर निगा ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लगेच त्याची माहिती रेस्क्यू सेंटरच्या डॉक्टरला दिली. मात्र, डॉक्टर पोहोचतील त्याच्या आधीच केटी- 1 या वाघाचा मृत्यू झाला होता. सकाळी सात वाजता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले आणि त्यानंतर वन विभागाच्या नियमानुसार केटी - 1 वाघाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू शरीराच्या मागील बाजूस झालेल्या एका अंतर्गत जखमेत मोठ्या प्रमाणावर पू जमल्यामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


मात्र, वाघाच्या अचानक झालेल्या मृत्यूचे खरे कारण तीन दिवसानंतर येणाऱ्या उत्तरीय तपासणीच्या अंतिम अहवालातूनच स्पष्ट होऊ शकेल अशी माहिती गोरेवाडा रेस्क्यू सेंटरचे व्यवस्थापक नंदकिशोर काळे यांनी दिली आहे. त्यामुळे अवघ्या दोन वर्षांचा जो वाघ दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत मानवावर हल्ले करून वन विभागाची झोप उडवत होता. तोच वाघ पिंजऱ्यात ठेवल्यानंतर अवघ्या 11 दिवसात मृत्यूच्या दारापर्यंत का आणि कसा पोहचला याचा सखोल तपास होण्याची गरज निर्माण झाली आहे.


ताडोबातल्या प्रस्तावित खाणीच्या लिलावाला विरोध, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र