सांगली: आठवड्याभरापूर्वी जी कृष्णामाई कोरडीठाक पडली होती, तिच सध्या खळखळून वाहते आहे. त्यामुळे सांगलीकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
गेल्या दोन दिवसांत कोयना धरणक्षेत्र आणि नदीच्या पट्ट्यात उत्तम पाऊस झाल्याने सध्या कृष्णा नदीच्या पात्रात अंदाजे १० फुटापर्यंत वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे तासागणिक पाण्याची पातळी वाढतेच आहे.यामुळे सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदा एप्रिल महिन्यातच कृष्णा नदीनं तळ गाठला होता. एरवी कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडलं जातं. मात्र, कोयना धरणातच पाणी साठा कमी झाल्याने यंदा धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आलेलं नव्हंत. जून महिन्यात तर कृष्णा नदी कोरडीठाक पडल्याने सांगलीकरांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
२००५ साली आलेल्या महापूराने सांगलीच्या आसपासच्या गावांत मोठी जिवित तसेच वित्तहानी झाली होती, पण यंदा कृष्णा करोडीठाक पडल्याने या परिस्थितीची तुलना १९७२च्या दुष्काळाशी होत होती.
पण गेल्या दोन दिवसांत कोयना धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.