कोपर्डीतील पीडित कुटुंबाला आज शस्त्र परवाना मिळणार?
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2016 07:42 AM (IST)
अहमदनगर : कोपर्डीतील पीडित कुटुंबीयांना आज शस्त्र परवाना मिळणार आहे. शस्त्र परवाना फाईलवर जिल्हाधिकाऱ्यांची सही झाल्याचं, शस्त्र परवाना विभागानं सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला भेट दिल्यानंतर, पीडित कुटुंबाला सुरक्षेसाठी तात्काळ शस्त्र परवाना देण्याचं अश्वासन दिलं होतं. पीडित कुटुंबाने तशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. २४ जुलैला जिल्हा प्रशासनाला त्यासंदर्भात आदेश दिला होता. त्यानंतर आता सुमारे सव्वा महिन्यानंतर संबंधित फाईलवर सही झाली आहे. यासंदर्भात माध्यमांत चर्चा होऊ लागल्यानं अखेर शस्त्र परवाना फाईलवर सही झाली. कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार 13 जुलैला कोपर्डीतील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी आजोबांच्या घरुन आपल्या स्वत:च्या घरी जात होती. त्यावेळी तिघांनी शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. तिची हत्या करण्याआधी तिच्या देहाची क्रूर विटंबनाही केली होती. याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे अटकेत आहेत. तीघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. त्यांच्यावर येत्या आठवड्यात आरोपपत्र सादर होण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या