अहमदनगर: देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सुमारे अडीच हजार लोकवस्ती असलेलं कोपर्डी गाव चिडीचूप आहे.

कोपर्डीमध्ये अघोषित बंद असल्याचं वातावरण असल्यामुळे, नगर जिल्ह्यातील हे छोटेसं गाव अगदी सामसूम आहे. गावातील शाळा, दुकाने बंद आहेत.



पीडित कुटुंब ही याच गावातील आणि तीनही आरोपी याच गावातील असल्यामुळे, या खटल्याचा निकाल काय लागतो, याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.  गावकऱ्यांचे व्यवहार आपोआप थांबले आहेत. गावातील प्रत्येक चौकात फक्त आणि फक्त निकालाचीच चर्चा आहे.



सकाळपासून गावातील नागरिकांनी दुचाकींवरुन अहमदनगर गाठलं. नगर जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी होत आहे.

उज्ज्वल निकम युक्तीवाद करणार
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आज बाजू मांडतील. उज्ज्वल निकम यांनी दोषींना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

दरम्यान, बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता आज होणार आहे.

शिक्षेच्या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर आजही अहमदनगर जिल्हा न्यायालयात कडक बंदोबस्त तैनात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. जलदगती न्यायालयात सुनावणी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.

31 जणांच्या साक्ष
कोपर्डी खटल्यात आतापर्यंत 31 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

कोपर्डी निकाल : दोषींना फाशी की जन्मठेप, आज फैसला

कोपर्डी प्रकरण : दोषींच्या वकिलांचा कोर्टातील युक्तीवाद जसाच्या तसा

कोपर्डी निकाल : मला फाशी नको, जन्मठेप द्या: जितेंद्र शिंदे

खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता, तरीही जिंकलो : निकम

कोपर्डी निकाल: आरोपींना जास्तीत जास्त काय शिक्षा होऊ शकते?

कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा

कोपर्डी निकाल: दोषींना कठड्यात उभं करुन न्यायाधीशांनी विचारलं….