कोल्हापूर : दिल्लीत मोर्चा करुन परत येणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची गाडी चुकीच्या दिशेने धावली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.


शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कोल्हापुरातून सुमारे 1500 शेतकरी 4 दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. हे आंदोलन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला शेतकरी निघाले. त्यावेळी या विशेष गाडीचा रस्ता चुकला आहे.

‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ तब्बल 160 किलोमीटरपर्यंत गाडी मथुरेहून बानमोरच्या दिशेनं धावली. त्यामुळे या गाडीला चार तास उशीर होणार आहे. यावेळी बानमोर इथं शेतकऱ्यांना जोरदार घोषणाबाजी केली आणि रेल्वे प्रशासनाचा निषेधही केला.

काल रात्री 10 वाजता स्वाभिमानी एक्स्प्रेस दिल्लीहून महाराष्ट्राकडे रवाना झाली. मथुरेहून कोटा असा मार्ग असताना, ग्वाल्हेरच्या दिशेने रेल्वे गेली. सकाळी साडेसहा वाजता मध्य प्रदेशमधील बामनेर स्टेशनजवळ हा प्रकार समोर आला. मात्र रेल्वेने तोपर्यंत चुकीच्या मार्गाने 160 किमी प्रवास केला होता.

स्वाभिमानी एक्सप्रेसमधील कार्यकर्त्यांनी बानमोर रेल्वे स्टेशनवर प्रचंड घोषणाबाजी केली. चुकीच्या मार्गाने रेल्वे नेल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला जाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खास रेल्वे बुक केली होती. सुमारे 1500 शेतकरी रेल्वेत होते.