नागपूर : जगातील सर्वात कठीण समजली जाणारी सायकलिंग अल्ट्रा मॅरेथॉन पहिल्यांदाच भारतातल्या एका तरुणाने पूर्ण केली आहे. नागपुरातील या तरुणाचं नाव आहे डॉ. अमित समर्थ. रेस अक्रॉस अमेरिका पूर्ण करणाऱ्या या तरुणाच्या सायकलस्वारीची कहाणी अत्यंत रोमहर्षक आहे.

चार नद्या... दोन वाळवंट... दोन पर्वतरांगा आणि बारा अमेरिकन राज्य... तब्बल 5 हजार किलोमीटरचं अंतर नागपूरच्या डॉ. अमित समर्थने सायकलने पार केलं आहे. अमितने अल्ट्रा इन्ड्युरन्स सायकल इव्हेंट मानली जाणारी रेस अक्रॉस अमेरिका पूर्ण केली, तीही फक्त 11 दिवस 21 तासांत...

आजवर भारतीयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता, मात्र कुणीही ही रेस पूर्ण करु शकलं नाही. तीच रेस पूर्ण करण्याचा मान आता अमितला मिळाला आहे.

संपूर्ण एक वर्षभर प्रचंड मेहनत केल्यानंतर त्याची फलश्रुती अमितला मिळाली. आता इतकी मोठी रेस पूर्ण करायची म्हणजे त्याचा खर्चही लाखांच्या घरात होता. जगातली सर्वात कठीण अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करत अमितने भारताचा झेंडा अटकेपार रोवला आहे. स्वत:चं नावही इतिहासात नोंदवलं आहे.