अहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा अहमदनगर सत्र न्यायालयात आज निकाल लागला. न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी निकाल जाहीर केला. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी तिन्ही दोषींना कोणत्या शिक्षा झाल्या, त्या संदर्भात माहिती दिली.     


अॅड. उज्ज्वल निकमांनी काय माहिती दिली?

  • कोपर्डी खटल्यातील तिन्ही (जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे) दोषींना वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा ठोठावण्यात आली.

  • तिन्ही दोषींना बलात्कार आणि हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

  • जितेंद्र शिंदेला पीडित मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 3 वर्षांची शिक्षा

  • जितेंद्र शिंदेने अज्ञान मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड

  • संतोष भवाळ आणि नितीन भैलुमेला बलात्कार करण्याचा कट रचणे, दोषीला बलात्कार करण्यास उद्युक्त करणे या प्रकरणी जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड

  • जितेंद्र शिंदेला पीडित मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्या प्रकरणी फाशीची शिक्षा.

  • संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांनी जितेंद्र शिंदेला बलात्कारासाठी उद्युक्त केले, तसेच बलात्काराचा कट रचला याप्रकरणी फाशीची शिक्षा.

  • आरोपी 2 तर्फे सुनावणी तहकूब केली त्यासाठी खर्च वसूल करण्याचे आदेश दिले, तो त्याने न भरल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल म्हणून 18 हजार वसूल करावा, जर दंड भरला नाही तर आरोपीला तीन महिन्यांची साधी शिक्षा.

  • सगळ्या दोषींना या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

  • सर्व दोषींना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे.


अखेर निकाल लागला!

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व  तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

सकाळी 11.23 वा न्यायाधीश कोर्टरुममध्ये दाखल झाल्या. त्यानंतर निकालाच्या वाचनाला सुरुवात झाली. अवघ्या सहा मिनिटांच्या आत तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

खून आणि बलात्काराच्या शिक्षेखाली तिघांनाही जन्मठेप आणि फाशीची शिक्षा झाल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.