रत्नागिरी : राजापुरातील गंगा तीर्थ क्षेत्राची ख्याती जगभरात पाहायाला आणि ऐकायला मिळते. शिलहार राजाच्या काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात देखील याच्या नोंदी आढळतात. पण, अशा या गंगा तीर्थ क्षेत्राची सध्या दुरावस्था झालेली दिसून येते. पडलेल्या भिंती, निखळलेल्या लाद्या, तुटलेले - उडालेले पत्रे, कोसळलेल्या संरक्षक भिंती हे सारं चित्र तुम्हाला गंगा तीर्थ क्षेत्राला भेट दिल्यानंतर पाहायाला मिळतं. गंगा आली की लाखो भाविक जगाच्या कोनाकोपऱ्यातून येथे येतात. शिवाय, इतर दिवशी देखील भाविक या तीर्थ क्षेत्राला भेट देतात. मुंबई - गोवा हायवेपासून साधारण अंतरावर उन्हाळे या गावी गंगा तीर्थ क्षेत्र आहे. याच ठिकाणी बारमाही वाहणारे गरम पाण्याचे झरे देखील आहेत. त्यामुळे या ठिकाणाला लोक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. अशा या प्रसिद्ध ठिकाणाची सध्या दुरावस्था झालेली पाहायाला मिळते. जवळपास 10 वर्षापूर्वी भक्तनिवास बांधण्यात आला. पण, त्यांची देखील दुरावस्था झाली असून त्या ठिकाणी आता भाताच्या पेंड्या ठेवल्याचं चित्र पाहायाला मिळते. भाविकांसह पर्यटक देखील इथे मोठ्या प्रमाणावर भेटी देत असल्यानं रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी 2017मध्ये 98 लाखांचा विकास निधी देखील दिला. पण, तो देखील परत गेला.
निधी परत जाण्यास कारण काय?
उन्हाळे ग्रामपंचायत आणि गंगापुत्र यांच्यात सध्या वाद दिसून येतो. त्याला समन्वयाचा अभाव देखील म्हणता येईल. गंगा तीर्थ क्षेत्राचा विकास करताना आम्हाला विश्वासात घ्यावं किंवा विकास कामं करताना आमचं म्हणणं देखील ऐकलं जावं, अशी गंगापुत्रांचे प्रतिनिधी डॉ. अविनाश सप्रे यांनी दिली. तर, आम्ही विकास कामं करायला तयार असून गंगापुत्र त्याला सहकार्य करायला तयार नाहीत, अशी प्रतिक्रिया उन्हाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य बिर्जे यांनी दिली. दरम्यान, अशा या वादात विकासकामं रखडली असून 2017मध्ये मिळालेला 98 लाखांचा निधी देखील परत गेला. शिवाय, तालुका किंवा जिल्हा पातळीवर देखील गंगेची कागदोपत्री कुठेच नोंद नाही, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी गंगापुत्रांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
लोकप्रतिनिधी काय करणार?
या साऱ्या वादात सध्या गंगा तीर्थ क्षेत्राचा विकास रखडला आहे. त्यामुळे पर्यटकांसह भाविकांची देखील या ठिकाणाला भेट दिल्यानंतर गैरसोय होते. या वादात आता लोकप्रतिनिधींची भूमिका देखील महत्त्वाची असणार असून किमान समन्वय साधण्याचा प्रयत्न तरी त्यांच्याकडून आता तरी होणार का? या साऱ्या वादात गंगा तीर्थ क्षेत्राची दुरावस्था कायम राहणार की ती आणखी बिघडणार? असा सवाल पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत.